विशाळगड : दहा हजार शिवभक्‍तांनी अनुभवला ‘थरार पावनखिंडीचा’

पावनखिंड
पावनखिंड
Published on
Updated on

विशाळगड : सुभाष पाटील शिवचरित्र हा महाराष्ट्राच्या प्रेरणेचा व अस्मितेचा स्रोत आहे. शिवरायांची कल्पकता, शौर्य, धाडस, दूरदृष्टी आणि गनिमी काव्याची यशस्विता म्हणजेच पन्हागडाच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका होय. वीर शिवा काशीद, बाजी-फुलाजीप्रभु देशपांडे यांची स्वामीभक्ती आणि दुर्दम्य इच्छाशक्ती स्वराज्याच्या घोडदौडीत सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. १३ जुलै १६६० चा तो रणसंग्राम ज्या भूमीने अनुभवला तेथील माती कपाळी लेवून, चिखल, काट्या-कुट्यातून, निसरड्या मार्गातून तो इतिहास अनुभवता यावा.
इतिहासाचा एक-एक पदर उलगडत, मोहिमेच्या माध्यमातून लाखो शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या शौर्याचे स्मरण करत खडतर मार्गातून थरार पावनखिंडीचा थरार अनुभवण्यासाठी खिंडीत दाखल होत आहेत. गेली २० दिवस पावनखिंड शिवभक्तांच्या घोषणांनी दुमदुमत आहे. शिवभक्तांची पाऊले पावनखिंडीकडे धावत आहेत. यंदाच्या पदभ्रमंती मोहिमेतून आतापर्यंत दहा हजार शिवभक्तांनी खिंडीला भेट दिली असून, खिंडीत आजही अलोट गर्दी पाहावयास मिळत आहे.

आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा मुसळधार पाऊस, किर्र घनदाट जंगल, काटे-कुटे, विजांचा कडकडाट.! या वातावरणात तलवारी घेतलेले सहाशेजण..,झप झप चालत होते. पाहता पाहता भाततळीची खिंड आली. निम्मे खिंडीत थांबले आणि उरलेल्यांनी खिंडीतून पुढची वाट धरली. थांबलेल्यांनी शत्रूला पुढे कित्येक तास झुंजवलं. त्यांची पार खांडोळी केली. पराक्रमाची शर्थ आणि अजोड स्वामिनिष्ठेचे दर्शन घडवीत त्यांनी भाततळीच्या दऱ्यातील खिंडीला अजरामर केले. यातूनच या खिंडीची ओळख झाली ती पावनखिंड.

पावनखिंडीत या वीरांच्या पराक्रमाला अभिवादन करणारे एक स्मारक आहे. रस्त्यावरून खाली दरीकडे पायऱ्या उतरताना खाली दिसते ती किर्र दाट झाडी, खाली छोटासा ओढ्यावरील पूल, तो पार केल्यावर समोर दिसते ते उजवीकडे ढाल-तलवार अन भगवा झेंडा असं वीरांचे स्मारक, याच ठिकाणी सुरुवात होते ती पावनखिंडीची. खिंडीच्या एका टोकालगत कासारी नदीचे उगमस्थान, खिंडीत उतरण्यासाठी दोन शिड्या, मोठमोठे खडक, शिळा पडलेल्या आहेत. खिंडीतून पुढे जावे तसे खिंडीची रुंदी आणि खोली वाढत जाते. खिंडीची रुंदी पंधरा फुटापर्यंत असावी. सगळीकडे शिळांचा खच आहे. खिंडीची लांबी पाचशे मीटर असावी. पावनखिंड घनदाट जंगलांनी आच्छादली आहे. भर पावसात पावनखिंड पाहता-पाहताच तो पराक्रमाचा, स्वामीनिष्ठेचा इतिहास अंगावर काटा आणतो.

१२ जुलै १६६० त्या रात्री, कोसळत्या पावसात हे शूर मावळे काय निष्ठेने लढली असतील असे वाटू लागते. त्यांना नतमस्तक व्हायला होते, आणि असे वाटते. आपणही एकदा असेच साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वीच्या त्या आषाढ पौर्णिमेला पन्हाळ्यावरून रात्री निघावं. शिवरायांच्या पालखीला खांदा देत पावनखिंडीपर्यंत जावं आणि शत्रूशी लढता-लढता धारातीर्थ पडावं आणि खिंडीसोबत पावन व्हाव.

या भूमीला अभिवादन करण्यासाठी सध्या 'पन्हाळा ते पावनखिंड' पदभ्रमंती मोहीम सुरू आहे. अनेक मावळे या मार्गावरून जात आहेत. पन्हाळ्यावरून मोहिमेस प्रारंभ होत असून, खिंडीतून मसाई पठारापर्यंतचा पल्ला मारला जातो. मसाई पठारावरील गारव्याशी खेळत खाली उतरून खडकाळ खिंडीतून दुर्गम वाटेने कुंभारवाडीतून खोतवाडीपर्यंत मजल मारत पुढे जंगल वाटेने माळेवाडी गाठली जाते. येथे मुक्काम करत पश्चिम घाटाचे जंगल काय चीज आहे याची चुणूक पाटेवाडी ते सुकाइमाचीच धनगरवाडा गाठेपर्यंत येते. येथून पुढे तासांतच जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत पांढरेपाणीमार्गे पावनखिंड गाठली जाते. येथे आल्यावर सर्वानाच उत्साहाचे भरते येते. पावनखिंडीत असलेल्या वीरांच्या स्मारकाला अभिवादन करताना साऱ्याचीच छाती अभिमानाने भरून येते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news