...तर बायकोला सासरी राहण्याची सक्ती करता येणार नाही : छत्तीसगड उच्च न्यायालय | पुढारी

...तर बायकोला सासरी राहण्याची सक्ती करता येणार नाही : छत्तीसगड उच्च न्यायालय

बायको नवऱ्याची गुलाम नाही - उच्च न्यायालयाचे सुनावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बायको ही नवऱ्याची गुलाम किंवा वेठबिगार नाही, जर तिच्या जीवाला धोका असेल तर सासरच्या लोकांसमवेत राहण्याची सक्ती करता येणार नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी, संजयकुमार जैसवाल यांनी हा निकाल दिला आहे. प्रिया शर्मा विरुद्ध संजित शर्मा या खटल्यात न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. बार अँड बेंच या वेबसाईटने ही  बातमी दिली आहे. (Wife cannot be treated as a bonded labourer)

२०१८ला कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात घटस्फोटाचे आदेश दिले होते. या विरोधात प्रिया शर्मा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. “नवऱ्याने लादलेल्या बंधनात बायकोने वेठबिगारासारखे किंवा गुलामासारखे राहावे असे अपेक्षित नाही. जर बायकोला भीती वाटत असेल, जीवाला धोका आहे असे वाटत असेल तर, किंवा परिस्थिती सामान्य वाटत नसेल तर सासरी राहाण्याची सक्ती करता येणार नाही.” असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

या जोडप्याचे लग्न ५ जून २०१५ ला झाले होते. पण मतभेदांमुळे २७ मे २०१६ला त्यांनी घटस्फोट घेतला. बायकोला माझ्या आईवडिलांसोबत राहायचे नव्हते, असा दावा नवऱ्याने केला होता. तर बायकोचे म्हणणे असे होते की, सासरच्या लोकांनी तिचा छळ केला होता, आणि हुंड्याची मागणी केली होती.

बायको दहशतीत होती (Wife cannot be treated as a bonded labourer)

या प्रकरणात नवऱ्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती आणि कौटुंबिक न्यायालयाने क्रुरतेच्या मुद्द्यावर घटस्फोट दिला.

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “बायको भीतीखाली होती असे दिसते. नवरा आणि सासरच्या लोकांनी तिला दहशतीत ठेवले होते, त्यामुळे तिला घर सोडणे भाग पडले. बायको सासू सासऱ्यांना आदर देत नाही, याचा कोणाताही पुरावा नवऱ्याला देता आलेला नाही. तसेच आईवडिलांना सोडण्यासाठी बायकोने नवऱ्यावर सक्ती केली असेही कुठे दिसत नाही.”
उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल रद्द ठरवला आहे.

हेही वाचा

Back to top button