

मजूर संस्थांच्या माध्यमातून कामे मिळावीत, यासाठी मजूर संस्था आणि संघ स्थापन करण्यात आला आहे. पण स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी एका नेत्याने ८२ संस्थांना संघाचे सभासदत्व देऊन संघ गळंकृत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे; पण हा संघ कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. मजूर संघ सर्वांचा आहे. यामुळे त्या संस्थांचे वर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक उदय जोशी यांनी सांगितले. काम वाटण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडून मजूर फेडरेशनकडे आणण्यासाठी नेते मंडळींकडे प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.मंजूर फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ संस्था प्रतिनिधींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन भिमराव नलवडे होते.
या वेळी उदय जोशी म्हणाले की, ज्या ८२ संस्थांना काम मिळवून देण्याचा डाव रचला आहे, त्या खाण मजूरांच्या संस्था आहेत, पण या संस्थांचे वर्गीकरण होत नाही, त्यामुळे त्यांचा हा डाव हाणून पाडला जाईल. संघाच्या निवडणुकीची चिंता आम्हाला नाही, त्यांनी करावी, असाही टोला त्यांनी लगावला. भविष्यात मजूर संस्थांना १० लाखापर्यंतची कामे मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले.
चेअरमन भिमराव नलवडे यावेळी म्हणाले की, २०१३ साली संघावर आमची सत्ता आली. त्यावेळी संघाच्या खात्यावर फक्त २६६० रुपये होते. आम्ही काटकसरीने कारभार करुन नवीन कार्यालय खरेदी केले. सध्या संघाची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. यावेळी तानाजी पोवार, चंद्रकांत गवळी सुरेश नलवडे, बयाजी शेळके, सर्जेराव देसाई, रमेश तोडकर आदी उपस्थित होते,. सूत्रसंचालन संचालक सुरेश पाटील यांनी केले. व्हा. चेअरमन प्रवीण नलवडे यांनी आभार मानले.
हेही वाचलंत का?