नागपुरात दहानंतर फटाके फोडण्यास बंदी; विशेष पथकांची स्थापन | पुढारी

नागपुरात दहानंतर फटाके फोडण्यास बंदी; विशेष पथकांची स्थापन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपूर शहरात रात्री दहानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यास बंदी घातली असून फटाके फोडणाऱ्यांवर कारवाईसाठी नागपूर पोलीस सज्ज झाले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पथक आणि गुन्हे शाखेचे विशेष पथके स्थापन करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी संचारबंदी लावली असून साथरोग प्रतिबंधक कायद्यासह एन्व्हार्नमेंट ॲक्टनुसार फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार, फक्त परवानगी असणारे ‘ग्रीन क्रॅकर्स’ स्वरूपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक दुकानाची झाडाझडती घेऊन ग्रीन क्रॅकर्सशिवाय अन्य मोठ्या आवाजाचे आणि कायद्याचे उल्लंघन करणारे फटाके दुकानात आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे फटाके फोडण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात विशेष पथके तयार करण्यात आले असून आकस्मिक छापे घालून दुकानाची झाडाझडती घेणार आहेत. बंदी असलेले फटाके पोलिस जप्त करणार असून विक्रेत्यांवरही कारवाई करणार आहेत. कायद्यानुसार परवानगी असलेले फटाके फक्त रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत फोडू शकता. रात्री दहानंतर फटाके फोडल्यास पोलिस पथक लगेच पोहोचून कारवाई करणार आहे.

गुप्तपणे गस्त

दिवाळीच्या खरेदीसाठी इतवारी, महाल, धरमपेठ आणि सीताबर्डी परिसरात गर्दी होत आहे. विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. चेनस्नॅचिंग किंवा लूटमार होण्याची शक्यता लक्षात घेता महिला पोलिसांचे साध्या वेशातील पथके गर्दी असलेल्या ठिकाणी गुप्तपणे गस्त घालत आहेत.

शहरातील कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्या सर्व सीसीटीव्हीवर पोलिस नियंत्रण कक्षातून वॉच ठेवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी विशेष करून दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे, अशा ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात येत आहे. कुणीही प्रतिबंधित असलेले फटाके फोडू नका. अन्यथा नियमानुसार कारवाई होईल, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button