Kolhapur News: प्रशासकीय अनास्थेमुळे शिपेकरवाडीची पेयजल योजना रखडली! पावसाळा तोंडावर आला तरीही पाण्यासाठी वणवण

'अजून किती वाट पाहायची?' संतप्त गावकऱ्यांचा सवाल
लोकसहभागातून खोदलेली विहीर मुजली आहे.
लोकसहभागातून खोदलेली विहीर मुजली आहे. pudhari photo
Published on
Updated on

Kolhapur News

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिपेकरवाडी येथील पेयजल योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर प्रशासनाने या योजनेकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. परिणामी, यंदाच्या कडक उन्हाळ्यातही गावाला टँकरनेच पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आता पावसाळा तोंडावर आला असतानाही ही योजना पूर्ण होणार कधी? असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

लोकसहभागातून खोदलेली विहीरही गाळात

बोलोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिपेकरवाडीची लोकसंख्या सुमारे ७०० च्या आसपास आहे. जानेवारी महिना संपला की, दरवर्षी येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या कायमच्या त्रासाला कंटाळून गेल्या वर्षी ग्रामस्थांनी एकत्र येत, पारंपरिक पाण्याचा स्त्रोत असलेल्या एका ठिकाणी लोकसहभागातून विहीर खोदली होती. मात्र, निधीअभावी या विहिरीला संरक्षक कठडा बांधता आला नाही. परिणामी, गतवर्षीच्या पावसाळ्यात आजूबाजूची माती ढासळून ही विहीर पूर्णपणे मुजली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ग्रामस्थांसमोर पुन्हा पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले.

लोकसहभागातून खोदलेली विहीर मुजली आहे.
Gokul election | मंत्री मुश्रीफ नकोत, मग महायुती म्हणून कसे लढणार?

उन्हाळा संपत आला, तरी प्रतीक्षाच!

उपवडे तलावातून बोलोली येथे आणि तिथून शिपेकरवाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी पेयजल योजनेतून ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. पण योजनाच अपूर्ण असल्याने गेल्या महिन्यापासून ग्रामपंचायतीला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. किमान उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तरी पेयजल योजनेचे पाणी मिळेल, या आशेवर शिपेकरवाडीवासीय चातकासारखी वाट पाहत होते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे, ग्रामपंचायतच्या आणि स्थानिक लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशाच आली आहे.

वाढीव निधीच्या मंजुरीअभावी पेयजल योजना खोळंबली!

योजनेच्या सद्यस्थितीबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "पेयजल योजनेसाठी ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर होता. त्यामध्ये पाईपलाईन टाकण्याचे आणि टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, पाणी उपसा करणाऱ्या मोटरसाठी वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. या वीजजोडणीच्या आणि संबंधित कामासाठी तसेच जादा पाईपलाईनसाठी अतिरिक्त १० लाख रुपयांच्या वाढीव निधीची मागणी वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहे," अशी माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या सरकारी मंजुरीच्या विळख्यात योजना रखडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

"गावात सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. प्रशासनाकडून टँकरने दिले जाणारे पाणी अत्यंत अपुरे असून ते नागरिक आणि पाळीव जनावरांनाही पुरत नाही. उन्हाच्या झळा सोसत अजून किती दिवस आम्ही पाण्याची वाट पाहायची? शासनाने यावर तातडीने तोडगा काढून आमचा पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा."
- तुकाराम शिपेकर (ग्रामस्थ, शिपेकरवाडी)
लोकसहभागातून खोदलेली विहीर मुजली आहे.
Almatti Dam | १५ ऑगस्टपर्यंत ‘अलमट्टी‌’ची पातळी ५१७ मीटरपर्यंत ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. राठोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news