

धीरज बरगे
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील वगळता महायुतीचे जिल्ह्यातील उर्वरित नेते ‘गोकुळ’ची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार, असे वक्तव्य करत आहेत. तर दुसरीकडे आमदार पाटील ‘गोकुळ’ मुश्रीफमुक्त करणार, असे जाहीर वक्तव्य करत आहेत. ‘गोकुळ’ निवडणुकीसंदर्भात महायुतीच्या नेत्यांमधूनच केल्या जाणार्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून संपूर्ण जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाला आहे.
रोजच्या आरोप-प्रत्यारोपांची पातळी आता खालावत असल्याने ‘गोकुळ’मधील वाद कधी मिटणार असा सवाल दूध उत्पादक व सभासदांमधून उपस्थित होत आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’मध्ये आता पक्षीय राजकारण सुरू झाले आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, असे संचालक सांगत असले, तरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यचे माजी संचालक एकाबाजूला आणि भाजपचे माजी संचालक एका बाजूला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महायुती म्हणून एकत्र असल्याचे सांगितले जात असले तरी काही नेते, संचालक यांची मने दुरावल्याची वस्तुस्थिती आहे.
महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना मंत्री मुश्रीफ सोबत असणे आवश्यकच आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात त्यांची मोठी ताकद आहे. माजी आमदार ए. वाय. पाटील, राजेश पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. तसेच, ‘गोकुळ’ची सत्ता पालटण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी चेअरमन अरुण डोंगळे, विश्वास पाटील हे देखील मंत्री मुश्रीफ नसलेल्या महायुतीत राहणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांना वगळून ‘गोकुळ’मध्ये महायुती एकसंध राहणार का, असा ही प्रश्न आहे.
‘गोकुळ’मधील वर्चस्व आणि जागा वाटपावरून नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामधून दोन नेत्यांमध्ये दुसर्याच्या आडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची पातळी आता खालावत असल्याने पुढील काळात ‘गोकुळ’मध्ये महायुतीचे संचालक म्हणून एकमेकांसमोर बसताना लाज वाटायला नको, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच हा वाद थांबावा, अशी अपेक्षा काही माजी संचालकांमधून व्यक्त होत आहे.