

नृसिंहवाडी : अधिक ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा व रविवार सुट्टीचा दिवस असा योग जुळून आल्याने नृसिंहवाडीत भाविकांचा जनसागर उसळला आहे. पहाटेपासूनच श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या असून कडाक्याच्या उन्हातही दत्तभक्तीला जणू उधाण आले आहे.
अधिक महिन्यातील पौर्णिमेचे विशेष धार्मिक महत्त्व असल्याने, महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेशातून लाखो दत्तभक्त कृष्णा-पंचगंगेच्या पवित्र संगमावर दाखल झाले आहेत. यामुळे संपूर्ण नृसिंहवाडी परिसर दत्तनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी नृसिंहवाडीत येण्यास सुरुवात केली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास मंदिर उघडल्यापासून दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी दत्त देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांगेत ठिकठिकाणी सावलीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय आणि वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसर आणि प्रमुख मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भाविकांच्या अलोट गर्दीमुळे येथील बहुमजली पार्किंग सकाळच्या सत्रातच पूर्णपणे फुल्ल झाले होते. मुख्य स्वागत कमानीपासून पुढे वाहनांना प्रवेश बंद केला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून माहेश्वरी भवन, पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट आणि कॉलेज परिसरात वाहनांचे पार्किंग करण्यात आले होते. मात्र, वाहनांची संख्या इतकी प्रचंड होती की, मुख्य राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे काहीकाळ भाविकांना मनःस्ताप सहन करावा लागला.