Narsobawadi News | गुरुपुष्यामृत योगावर नृसिंहवाडीत भक्तांची गर्दी; लाखांवर भाविकांनी घेतले दत्त दर्शन

गुरुवार आणि गुरुपुष्यामृत असा दुर्मिळ त्रिवेणी योग, पार्किंग फुल्ल- वाहतूकीची कोंडी
Narsobawadi News
नृसिंहवाडीत पार्किंग फूल्ल झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती
Published on
Updated on

नृसिंहवाडी : गुरुपुष्यामृत योगाच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुवारी भाविकांचा महापूर लोटला. अधिक महिना, गुरुवार आणि गुरुपुष्यामृत असा दुर्मिळ त्रिवेणी योग जुळून आल्याने, राज्यभरातून आलेल्या लाखांवर भाविकांनी मनोभावे दत्त दर्शन घेतले. पहाटेच्या काकड आरतीपासूनच दत्त मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'च्या जयघोषाने संपूर्ण कृष्णाकाठ दुमदुमून गेला होता.

या अभूतपूर्व गर्दीमुळे गावातील सर्वच प्रमुख मार्ग आणि गल्ल्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. दर्शनानंतर भाविकांनी येथील सुप्रसिद्ध बासुंदी, पेढे यांसारखी मिठाई आणि कृष्णाकाठची सुप्रसिद्ध वांगी खरेदी करण्यासाठी व्यापारी पेठेत एकच गर्दी केल्याने मोठी आर्थिक रेलचेल पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली आणि परिसरातील गावांतून हजारो भाविक दत्तचरणी लीन होण्यासाठी पायी चालत येत होते.

दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन ग्रामपंचायत व दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेल्या नव्या दर्शन रांगेच्या नियोजित व्यवस्थेमुळे भाविकांना दर्शन घेताना मोठी सुलभता येत आहे. बॅरिकेडिंग आणि मार्गिकेमुळे मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांना पुरेशी मोकळीक मिळत आहे. परिणामी, मंदिराचा पोर्च आणि मुख्य घाटावर होणारी अनियंत्रित गर्दी निम्म्यावर आली असून, कडक ऊन आणि गर्दीतही भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दत्त दर्शन घेता आले. दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुंडो पुजारी, सचिव नारायण गेंडे-पुजारी व विश्वस्तांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले.

वाहतूक कोंडी अन् पार्किंग फुल्ल

भाविकांच्या अलोट गर्दीमुळे येथील बहुमजली पार्किंग सकाळच्या सत्रातच पूर्णपणे फुल्ल झाले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने मुख्य स्वागत कमानीपासून पुढे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून माहेश्वरी भवन, पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट आणि कॉलेज परिसरात वाहनांचे पार्किंग करण्यात आले होते. मात्र, वाहनांची संख्या इतकी प्रचंड होती की, मुख्य राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news