

पंढरपूर : अधिक मासानिमत्त श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. असे असताना तुळशी अर्चन व इतर पूजांमुळे दर्शन रांग थांबविण्यात येत आहे. त्यामुळे पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांना एकाच ठिकाणी तासन्तास थांबावे लागत आहे. त्यामुळे किमान अधिक मासात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पूजांची संख्या कमी करण्याची मागणी भाविकांमधून केली जात आहे. मात्र, मंदिर प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे भाविकांचे रांगेत हाल होत आहेत.
अधिक मासानिमित्त भाविकांचा मोठा ओघ आहे. शनिवार व रविवार विकेंड तसेच शाळांना सुट्ट्या असल्यामुळे गर्दी वाढत आहे. त्यामुळे दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडमध्ये दाखल झाली आहे. भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन रांग बनविण्यात आली आहे. मात्र, शनिवारी रात्री आलेल्या पावसाने भिजावे लागल्याने भाविकांचे हाल झाले. रात्री पिण्याचे पाणी, चहा मिळत नाही. कहर म्हणजे रात्रीच्या वेळी दर्शन रांगेत सुरक्षा रक्षक, पोलिस बंदोबस्त नसल्याने घुसखोरी वाढत असून, वादावादी होत आहे.
शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे दर्शन रांगेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे भाविकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यातच रांगेच्या बाजूला लाईटच्या केबल उघड्याच असल्यामुळे भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मंदिर समिती आणि नगरपालिका प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराबद्दल भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारकरी आणि भाविकांकडून तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजनेची मागणी होत आहे.