इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : फासेपारधी आदिवासींच्या जातीच्या दाखल्यावरील चुकीची नोंद रद्द करून तातडीने दुरूस्ती करावी, असे पत्र खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे. 'बाप फासेपारधी अन् मुलं फन्सपारधी' या मथळ्याखाली दै.'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर खासदार माने यांनी पत्र दिले. त्यामुळे येत्या काही दिवसात सुधारीत दाखले मिळतील अशी अपेक्षा आहे.
राज्यात फासेपारधी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना यापूर्वी फासेपारधी असे दाखले दिले जात होते. मात्र २०१७ पासून ऑनलाईन नोंदीत 'फासेपारधी' ऐवजी 'फन्सपारधी' अशी चुकीची जात नोंदवण्यात आले. सध्या पुरावे फासेपारधी असे दिले तरी फन्स पारधी म्हणूनच दाखले दिले जात आहेत. समाज संघटनेचे अध्यक्ष मोहन काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला मात्र दखल घेतली जात नव्हती. दै.'पुढारी'तील वृत्तानंतर हालचाली सुरु झाल्याने समाजाला दिलासा मिळेल अशी आशा आहे.