पंत-कार्तिकवरून गावस्करांचे मोठे विधान; म्हणाले, ‘जोखीम घेतली नाही तर…’ | पुढारी

पंत-कार्तिकवरून गावस्करांचे मोठे विधान; म्हणाले, ‘जोखीम घेतली नाही तर...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 (T20) मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर उद्या (दि. 19) संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 मालिकेत भारत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडणे कर्णधार रोहित शर्मासाठी अजिबात सोपे नाही. त्याला ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. अशातच टी-20 विश्वचषकात या दोन खेळाडूंपैकी कोण प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार याबाबत पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. तज्ज्ञ आणि दिग्गजांनीही यावर आपली मते मांडली आहेत. ज्यामध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये पंत की, कार्तिक खेळणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याची जागा जवळपास निश्चित झाली आहे. पण सर्वात मोठी अडचण ही आहे की, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यापैकी एकालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळता येणार आहे. आता या प्रकरणी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (sunil gavaskar) यांच्या प्रतिक्रियेने सर्वांनाच हैराण केले आहे.

सुनील गावस्कर यांनी दोन्ही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, ‘मला ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांसोबत खेळायला आवडेल. मी ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर, हार्दिक पंड्याला सहाव्या क्रमांकावर आणि दिनेश कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवेन. मी हार्दिक आणि इतर गोलंदाजांचे चार पर्याय देईन. तुम्ही जोखीम घेतली नाही तर जिंकणार कसे? तुम्हाला सर्व विभागांमध्ये धोका पत्करावा लागेल, तरच तुम्हाला जेतेपद पटकावता येईल’, असे मत व्यक्त केले आहे.

2022 च्या आशिया चषक स्पर्धेत ऋषभ पंतची कामगिरी निराशाजनक होती. तर संघात समावेश करण्यात आलेल्या दिनेश कार्तिकला फारशी संधी देण्यात आली नाही. पण आयपीएलच्या आकड्यांकडे पाहिल्यास दिनेश कार्तिक हा पंतपेक्षा खूप पुढे असल्याची साक्ष देतात. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने 55 च्या सरासरीने 330 धावा फटकावल्या. आता रोहित शर्मा कोणावर विश्वास ठेवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले होते की, संघात पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक नाही. आम्ही परिस्थिती आणि प्रतिस्पर्धी टीमनुसार खेळतो. तत्कालीन परिस्थितीत आम्हाला जो संघ सर्वोत्तम वाटतो त्यानुसार मैदानात उतरतो. आशिया कपमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आम्हाला दिनेश कार्तिक योग्य वाटला म्हणून त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले.’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार.

Back to top button