

Devendra Fadnavis’ Candid Remark on Shinde and Ajit Pawar:
कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मिसळ कट्टा’ या अनोख्या जनसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या. राजकारण, वैयक्तिक आयुष्य, सोशल मीडिया, विरोधक, तसेच कोल्हापूरच्या मिसळीपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी सहज आणि विनोदी भाष्य केलं. त्यामुळे हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहेत.
कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मी जर राजकारणात नसतो, तर नक्कीच वकील म्हणून काम करत असतो.” त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबतही त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत मत मांडले.
“एकनाथ शिंदे राजकारणात नसते, तर ते नक्कीच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असते. अजित दादा राजकारणात नसते, तर ते एकतर शेतकरी असते किंवा पोलीस निरीक्षक. कारण त्यांना प्रश्न विचारण्याची आणि उत्तर मागण्याची सवय आहे,” असे ते हसत म्हणाले.
विरोधकांवर बोलताना त्यांनी खास शैलीत टीका केली. “विरोधक असावा तर राहुल गांधी यांच्यासारखा असावा. ते विरोधात असल्यामुळे आमची सत्ता काही जात नाही,” असे विधान त्यांनी यावेळी केले.
आजच्या काळात सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित करताना फडणवीस म्हणाले, “जगाशी कनेक्ट राहायचं असेल तर सोशल मीडिया हा सर्वात चांगला पर्याय आहे.” आवडत्या इन्फ्लुएन्सरबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अनेक इन्फ्लुएन्सर त्यांना आवडतात. मात्र राजकीय प्रभावाच्या दृष्टीने अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे हे मोठे राजकीय इन्फ्लुएन्सर होते आणि सध्याच्या काळात नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे इन्फ्लुएन्सर असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर म्हटलं की मिसळ आलीचं. या विषयावर बोलताना फडणवीस अगदी मनापासून व्यक्त झाले. “मला कोल्हापूरची मिसळ खूप आवडते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची मिसळ मिळते, पण कोल्हापूरची मिसळ काही औरच आहे,” असे ते म्हणाले. कोल्हापूरकरांची खासियत सांगताना त्यांनी सांगितले, “कोल्हापूरमध्ये माणूस भेटला की पहिला प्रश्न ‘जेवलास का?’ असा असतो.
आपल्या स्वभावाबद्दलही त्यांनी प्रामाणिक कबुली दिली. “मला भूक लागली की राग येतो. माझा राग शांत करायचा असेल तर मला जेवायला द्यायचं,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना हसवले. तसेच कोल्हापूरचा ‘भावा’ हा शब्द आपल्याला खूप आवडतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.