

संचालक मंडळ बैठकीतील ठरावाबाबत संचालकांत वाद
व्यवस्थापनावरील खर्च ६५ टक्क्यांवर जाणार असल्याने विरोध
Kolhapur market committee
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची आर्थिक परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून संचालकांमध्ये मतभेद आहेत; परंतु कर्मचाऱ्यांनी काही संचालकांना 'खूश' केले असल्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ते आग्रही आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा बाजार समितीने केलेला ठराव वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणपणे १५० कर्मचारी आहेत. बाजार समितीमध्ये सध्या अस्थापनावरील खर्च हा अगोदरच ४५ टक्क्यापेक्षा अधिक गेला आहे. असे असताना येथील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा घाट बाजार समितीमधील कारभाऱ्यांचा सुरू आहे.
बाजार समितीची आर्थिक स्थिती पाहता त्याला अन्य संचालकांचा विरोध आहे. तरीदेखील कारभारी संचालक आंब्याचा सिझन संपण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी धडपडत आहेत.
बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सहकार विभागाच्या वतीनेही पत्र काढून यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे; परंतु संचालक मंडळाच्या बैठकीतील ठरावावरच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचे समजते.
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आपला विरोध नाही; परंतु बाजार समितीची आर्थिक स्थिती पाहता सातवा वेतन आयोग लागू केल्यास व्यवस्थापनावरील खर्च ६५ ते ६८ टक्क्यावर जाणार आहे. त्यामुळे बाजार समिती अडचणीत येण्याची शक्यता असल्याने याला आपला विरोध आहे.
नंदकुमार वळंजू, संचालक, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती