

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य व शिवसेना (शिंदे गट) प्रणित राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने विरोधी आघाडीचा धुव्वा उडवला. १८ पैकी १६ जागा जिंकत बाजार समितीवरील आपली सत्ता कायम ठेवली. विरोधी आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर हमाल-तोलाईदार गटात अपक्ष उमेदवार विजयी झाला. व्यापारी गटातील दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर निकाल जाहीर करण्यात आला. विजयानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
रविवारी सकाळी आठ वाजता रमणमळा येथील शासकीय बहूउद्देशीय हॉलमध्ये सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीमध्ये ग्रामपंचायत, अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार या तीन गटांची ३३ टेबलावर मतमोजणी घेण्यात आली. सकाळी नऊ वाजता हमाल-तोलाईदार मतदार संघाचा निकाल जाहीर झाला, त्यात अपक्ष उमेदवार बाबूराव खोत विजयी झाले.
व्यापारी गटात सत्तारुढ आघाडीचे वैभव सावर्डेकर व विरोधी आघाडीचे नंदकुमार वळंजू हे आघाडीवर होते तर सत्तारुढ गटाचे कुमार आहूजा यांना २७७ तर विरोधी आघाडीचे अमर क्षीरसागर यांना २७१ मते मिळाली होती. यावर क्षीरसागर यांनी आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. यावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगांवे यांनी सर्व मतमोजणी झाल्यानंतर व्यापारी गटाची फेरमतमोजणी केली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान ग्रामपंचायत मतदार संघाची मतमोजणी साडे दहा वाजता संपली. त्यात सत्तारुढ आघाडीचे सुयोग वाडकर, शिवाजी पाटील, नाना कांबळे, पांडूरंग काशीद हे उमेदवार १ हजारपेक्षा अधिक मताच्या फरकांनी विजयी झाले.
सकाळी ११ वाजता दुसर्या फेरीत विकास सेवा संस्था गटाची मतमोजणी सुरु झाली. त्यामध्ये विकास संस्था मतदारसंघातील सर्व ११ उमेदवार हे विरोधी आघाडीच्या उमेदवारांच्यापेक्षा पहिल्या फेरीपासून एक हजार मताच्या फरकांनी आघाडीवर होते. दुपारी एक वाजता या गटाची मतमोजणी संपली. सत्तारुढ आघाडीचे ११ उमेदवार विरोधी आघाडीतील उमेदवारांपेक्षा ६ हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले.
व्यापारी गटाच्या मतमोजणीमध्ये कुमार आहुजा आणि वैभव सावर्डेकर यांना समान मते मिळाली. त्यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आला लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात चिठ्ठी आहूजा यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
अनुसूचित जाती-जमाती गटातील विजय झालेले नाना धर्मा कांबळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. कागल तालुक्यात ते माजी आ. संजयबाबा घाटगे गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना ३२३३ मते मिळाली. विरोधी गटाचे आरपीआय (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांना २०५३ मते मिळाली. नाना कांबळे १,१८० मताधिक्यांनी विजयी झाले.
बाजार समितीच्या राजकारणात बाबासाहेब पाटील-भुयेकर यांचे एकेकाळी वर्चस्व होते. स्वत: भुयेकर हे चारवेळा बाजार समितीवर निवडून गेले होते. बाबासाहेबांच्या नंतर त्यांचे चिरंजीव भारत पाटील (भुयेकर) हे बाजार समितीवर निवडून गेले आहेत.
या निवडणुकीत अडते-व्यापारी मतदार संघातून माजी संचालक नंदकुमार वळंजू व हमाल मतदारसंघातून बाबूराव खोत हे दोन माजी संचालक विजयी झाले आहेत. या वेळी बोलताना बाबूराव खोत म्हणाले, हा विजय कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे. आपल्या विजयासाठी कामगारांनी मोठे परीश्रम घेतले. त्यामुळे विजय मिळवता आला.
१) विकास सेवा संस्था मतदार संघ
सर्वसाधारण गट
प्रकाश देसाई (९,५९२)
राजाराम चव्हाण ( ९,३९७ )
भारत पाटील-भुयेकर ( ९,३९५ )
शेखर देसाई (९,३२१)
बाळासाहेब पाटील ( ९,३१६ )
संभाजी पाटील (पैलवान) ( ९,२७७ )
सुर्यकांत पाटील ( ९,१५१ )
महिला प्रतिनिधी
सौ. मेघा देसाई ( ९,४९९ )
सोनाली पाटील ( ९,३५० )
इतर मागासवर्गीय गट
शंकर पाटील ( ९,७२६)
विमुक्त जाती, भटक्या जमाती
संदीप वरंडेकर ( ९,५३६ )
२) ग्रामपंचायत मतदार संघ
३) अडते-व्यापारी मतदार संघ
नंदकुमार वळंजू ३११
कुमार आहूजा २७७
४) हमाल-मापाडी मतदार संघ
बाबूराव खोत ४११.
हेही वाचा