

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभागरचना होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये तत्कालीन महायुतीच्या सरकारने तसा निर्णय घेतला होता. या निर्णयाप्रमाणेच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता संपर्काचे जाळे वाढवावे लागणार आहे. आपापाल्या प्रभागात संपर्क ठेवून शेजारच्या प्रभागातही संपर्क ठेवावा लागणार आहे. चार प्रभागांचा एक प्रभाग होणार असल्याने मतदारसंख्या वाढणार आहे.
कोल्हापूर महापालिकेची लांबलेली निवडणूक येत्या चार महिन्यांत होईल. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांचा मार्ग मोकळा केल्याने आता हालचाली वेग घेणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने पारंपरिक पद्धतींना छेद देऊन नव्याने रचना करण्यात येणार आहे. सध्या शहरात 81 प्रभाग आणि 81 नगरसेवक आहेत. नव्या प्रभागरचनेत 31 प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या 92 होईल, असा अंदाज आहे.
प्रभागरचनेसंदर्भात निवडणूक आयोगाकडून पुढील सूचना आल्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टता येईल. महापालिकेने यापूर्वी दोनवेळा आरक्षण सोडत काढली होती; परंतु ती रद्द करण्यात आली. एक हजार मतदारसंख्या याप्रमाणे मतदारसंघाचे सेट महापालिका प्रशासनाने यापूर्वी तयार करुन ठेवले आहेत. नवीन नोंदणी झालेल्या मतदारांचा त्यामध्ये समावेश करून नवीन मतदारांचा समावेश करून मतदार यादी तयार करावी लागणार आहे.
महापालिकेच्या 2025 निवडणुकीसाठी बहुसदस्यीय मतदारसंघ होणार असल्याने किमान 15 हजार मतदारांतून नगरसेवक निवडावे लागणार आहेत. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार हा सर्वच बाजूंनी ताकदीचा असावा लागणार आहे. किमान दोन ते अडीच हजार मते पडतील इतकी त्याची क्षमता हवी. याशिवाय इतर उमेदवारही ताकदीचे असावे लागणार आहेत, तरच या उमेदवारांना यश मिळणार आहे. त्यामुळे प्रभागात संपर्काचे जाळे वाढवावे लागणार आहे.