

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण, आंदोलने, रास्ता रोको, कँडल मार्च काढून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. (Kolhapur Maratha Andolan)
गुडाळ, मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गुडाळ (ता. राधानगरी) येथे आज ( दि.१) सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. गुडाळ -गुडाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या प्रांगणातील व्यासपीठावर ठिय्या आंदोलन केले. (Kolhapur Maratha Andolan)
अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे- पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी करत असलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. त्याचबरोबर आमदार, खासदार यांना गावात प्रवेश बंदी घालण्यात आली. तर उपोषण हे शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचे व कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, असे आवाहन येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पेठवडगाव येथे साखळी उपोषणात आज महिलांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. तर वाचाळ पक्षनेत्यांचा तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी अंतरवली सराटी (जि. जालना) येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बिद्री (ता. कागल) गावातील ग्रामस्थांनी मोटर सायकल रॅली मंगळवार रात्री कँडल मार्च काढला. बुधवार सकाळपासून मुख्य बाजारपेठ दिवसभर बंद ठेवत कडकडीत बंद पाळत जोरदार निर्दशने करण्यात आली.
राज्य सरकारने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ताबडतोब जाहीर करावा, असा ठराव कडवे (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत मंजूर केला. हा ठराव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून दिला आहे.
हेही वाचा