कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी सावर्डे दुमालात मशाल फेरी | पुढारी

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी सावर्डे दुमालात मशाल फेरी

शिरोली दुमाला : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सावर्डे दुमाला (ता. करवीर ) येथे भव्य मशाल फेरी काढली. मराठा आरक्षण मागणीची धग तेवत ठेवण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मशाल फेरीत सहभाग नोंदवला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, मनोज जरांगे तुम आगे बढो… अशा घोषणा देत मराठा आरक्षणाची जोरदार मागणी करण्यात आली.

सकल मराठा समाज व सर्व ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात सर्व नेते, पुढारी यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात बंदीचा फलक उभारला आहे. या फलकाजवळ सायंकाळी गावातील महिला व ग्रामस्थ एकत्र आले. त्यानंतर श्री राम मंदिरात आरक्षणाच्या लढ्याची मशाल प्रज्वलीत करून संपूर्ण गावातून मशाल फेरी काढण्यात आली. मशाल फेरीत महिलांनी हाती मशाल घेऊन आरक्षण लढ्याची धार आता थांबणार नाही, हेच सूचित केले. फेरीत गावातील लहान मुले, मुली, युवक -युवती उपस्थित होते.

शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा झाली. सभेत मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी ग्रामदैवत भावेश्वरी देवीकडे मनोमन प्रार्थनाही करण्यात आली. सभा होऊन फेरीची सांगता करण्यात आली. तसेच विविध कार्यक्रम ठेवून मराठा आरक्षण लढा बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.

हेही वाचा 

Back to top button