कोल्हापूर: मराठा आंदोलकांनी आमदार राजूबाबा आवळे यांची गाडी रोखली | पुढारी

कोल्हापूर: मराठा आंदोलकांनी आमदार राजूबाबा आवळे यांची गाडी रोखली

किणी, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण मागणीसाठी वडगाव येथील आंदोलनाने जोर धरला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव येथे आमदार राजूबाबा आवळे यांची गाडी अडवून राजीनाम्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

पेठवडगाव येथील नगरपालिका चौकात वडगाव शहरासह पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून आजच्या उपोषणात खोची, वाठार तर्फ वडगाव व नागोबावाडी येथील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आमदार आवळे हातकणंगलेहून सूतगिरणीकडे जात असल्याची माहिती उपोषणस्थळी असणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर बिरदेव चौकाजवळ आवळे यांची गाडी अडवून धरण्यात आली.

यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आवळे यांनी त्वरित राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या बाजूचा असून तशी भूमिकाही आपण स्वतः व पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपण समाजबांधवांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे आवळे यांनी स्पष्ट केले. या विषयावर विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी देखील राज्यपालांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांना जाऊ देण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील सकल मराठा समाजचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button