कोल्हापूर : म्हाळसवडे धनगरवाडा भोगतोय मरणयातना

कोल्हापूर : म्हाळसवडे धनगरवाडा भोगतोय मरणयातना
Published on
Updated on

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शाहूवाडी तालुक्यातील म्हाळसवडे धनगरवाडा पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व पाठपूराव्याच्या अभावामुळे मरणयातना भोगत आहे. रस्त्याची सोय नाही, विद्युत पोलांची दयनीय अवस्था, शिक्षणाची गैरसोय व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, असे कितीतरी समस्यांचा सामना हा धनगरवाडा करत आहे.

ग्रुप ग्रामपंचायत पणुद्रे-म्हाळसवडे अंतर्गत हा धनगरवाडा येतो. या धनगरवाडयाला म्हाळसवडेचा धनगरवाडा म्हटले जाते. तीनशे ते साडेतीनशे लोकवस्तीच्या या धनगरवाड्यावरील तरुण वर्ग कामानिमित्त बाहेर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे आहेत. वाड्यावर वयस्कर व्यक्तींचाच राबता. त्यामुळे येथील समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष. वीज, पाणी, रस्ते या समस्या त्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या. आपला उदरनिर्वाह जंगली लाकूड, डोंगरचा रानमेवा, कडीपत्ता, तमालपत्र विकून करत आहेत. शेळ्या-मेंढ्या, म्हैस, गाय आदी जनावरांचे पालन करत तुटपुंज्या शेतीवर संसार फुलविला जातो. निवडणुका जवळ आल्या की, लोकप्रतिनिधी येथे येऊन त्यांच्या घोंगड्यावर बसून आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र ऐन समस्येवेळी इकडे कोण फिरकतच नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलमिशन योजनेंतर्गत २२ लाख ४२ हजाराचा निधी मंजूर झाला. २१ मार्च २०२२ ते २० सप्टेंबर २०२२ या कालावधीत काम पूर्ण  करण्याचे टेंडर निघाले. ठेकेदाराने कामही घेतले. पाण्याची टाकी, पाईप लाईनची कामे ठेकेदाराने पूर्ण केलीत. वाढीव निधी मंजूर करून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गावाला पाणी पुरवणारी जुनी विहीर पाडली. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खोदलेल्या विहिरीमध्ये गाळ साचला आहे. लोकांना पाण्यासाठी चिखलातून वणवण करावी लागत आहे. वयस्कर माणसाचे अतोनात हाल होत असून अशुद्ध गढूळ पाणी पिऊन रोगराई व भयानक आजारांना आमंत्रण दिले जात आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने येथील युवकांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधून टँकरने पाणी पुरविण्याची मागणी केली. मात्र इकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सदर कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी संजय कस्तुरे, बाबू कस्तुरे, बापू कस्तुरे, प्रकाश कस्तुरे यांनी केली आहे. वाड्यावरील विजेचे खांब सडल्याने तसेच गंजल्याने विद्युत पोल धोकादायक अवस्थेत आहेत. शिक्षणाची अवस्था बिकट आहे. तरी या गोष्टीचा शासनस्तरावर लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करून समस्या सोडवाव्या, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

वीज, पाण्याचा प्रश्न येथील नागरिकांना सतावत आहे. विहिरीच्या अपूर्ण कामांमुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असते. पाणी टँकरची मागणी केली होती मात्र ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष आहे. संबंधित कामाची कसून चौकशी करावी, ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारावा, अन्यथा तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल.
केशव कस्तुरे, म्हाळसवडे धनगरवाडा

 

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news