

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मांसाहार आणि कोल्हापूरकरांचे नाते तसे जगप्रसिद्ध आहे. तांबडा, पांढरा रस्सा, सुक्के मटण आणि बिर्याणी यावर आठवड्याच्या बुधवारी आणि रविवारी तडाखाच दिला जातो. रविवारी दीप अमावस्येला म्हणजेच गटारीला कोल्हापूरकरांनी 4 टन चिकन, 2 टन मटण आणि एक टनांहून अधिक माशांवर चांगलाच ताव मारला.
मंगळवारपासून (दि. 18) अधिक मास सुरू होत आहे. रविवारी आलेल्या दर्श अमावस्येला गटारी असेही संबोधले जाते. अधिक श्रावण मासामध्ये मासांहार केला जात नाही. अशावेळी अमावस्याही रविवारीच आल्याने कोल्हापुरात खवय्यांनी मासांहारावर ताव मारला.
शहरासह उपनगरातील मटण विक्री दुकानांत सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती. मटण, चिकन, मासे खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागून होत्या. सध्या नदीचे मासेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून येणार्या रस्त्यांकडेला मासे विक्री सुरू होती.
खाटिक मंडईमध्ये खेकडे, चिंगळ्या खरेदीसाठी सकाळपासून गर्दी होती. चिकनचे दरही सर्वसामान्यांच्या अवाक्यात असल्याने चिकन खरेदीकडेही मोठा ओढा होता. फुलेवाडी, आंबेवाडी, रिंगरोड, कळंबा, सुभाष रोड या परिसरात थेट कोकणातून येणार्या समुद्री माशांच्या खरेदीसाठीही गर्दी दिसून आली.
रविवारी शहरात सुमारे 4 टन चिकन, 2 टन मटण, 1 टन मासे यासोबतच खेकडे, चिंगळ्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे खाटिक समाजाचे पदाधिकारी विजय कांबळे यांनी सांगितले. शहरातील हॉटेलमध्येही रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.