

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून पाठोपाठ निम्मा जुलै उलटला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. दि.1 जून ते दि. 16 जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत सरासरीच्या तब्बल 63.1 टक्के पाऊस कमी झाला आहे. दि. 1 जुलैपासून आतापर्यंत केवळ 22 टक्के पाऊस झाला आहे. कमी पावसाने चिंता कायम आहे.
जिल्ह्यात मान्सून उशिराने दाखल झाला. त्यानंतरही तो दमदार बरसला नाही. जूनमध्ये सरासरीच्या केवळ 25.8 टक्केच पाऊस झाला. जून महिन्यात 362.9 मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी तो केवळ 93.7 मि.मी. झाला. जूनमध्ये तब्बल 74.2 टक्के कमी पाऊस झाला. पाऊस जुलैमध्ये सरासरी भरून काढतो, असे दरवेळचे चित्र असते. यावर्षी मात्र, जुलै निम्मा झाला तरीही जोरदार पाऊस झालेला नाही. दि. 1 ते दि. 16 असा निम्मा जुलै झाला आहे. या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 353 मि.मी. पाऊस पडायला पाहिजे होता. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात केवळ 171 मि.मी. म्हणजे 48.3 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 1 जून ते 16 जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत 716.7 मि.मी. पाऊस बरसतो. यावर्षी मात्र, तो 264.7 मि.मी.झाला आहे. हे प्रमाण 36.9 टक्के इतके आहे. यामुळे या दीड महिन्यात तब्बल 63 टक्के कमी पाऊस झाला आहे.
टंचाईची चिंता कायम
जुलै, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होतो. सर्वाधिक पाऊस जुलैमध्ये असतो. यावर्षी जुलैमध्येच पावसाने दडी मारल्याने चिंता आहे. आता उर्वरित 15 दिवस आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण वाढले नाही तर जिल्ह्यावर भविष्यात टंचाईचे सावट आहे.
सात तालुक्यांत 50 टक्केही पाऊस नाही
राधानगरी, चंदगड, पन्हाळा या तालुक्यांसह आजरा, गडहिंग्लज, शिरोळ व हातकणंगले या तालुक्यांत 50 टक्केही पाऊस झालेला नाही. यावर्षी सर्वात कमी पाऊस राधानगरी तालुक्यात अवघा 27.3 टक्के झाला आहे. सर्वाधिक भुदरगड तालुक्यात झाला आहे. तिथेही 84.2 टक्के पाऊस झाला आहे.
कडगाव परिसरात सर्वाधिक पाऊस
भुदरगड तालुक्यातील कडगाव परिसरात 1 जून ते 16 जुलै या कालावधीत 191 टक्के पाऊस झाला आहे. बिद्री (ता. कागल) परिसरात 136 टक्के, आंबा (ता. शाहूवाडी) परिसरात 125 टक्के, सांगरूळ (ता. करवीर) परिसरात 92 टक्के, गगनबावड्यात 69.7 टक्के पाऊस झाला.