गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राधानगरी तालुक्यातील मालवे ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी आठच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. लोकनियुक्त सरपंच पदी प्रियांका प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निपाणी-फोंडा राज्य मार्ग शेजारी असूनही विकासापासून काहीशा वंचित असलेल्या मालवे ग्रामपंचायतीची निवडणूक 'सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास करणे' या मुद्द्यावर बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. ग्रामदैवत हनुमान देवालयाच्या व्यवस्थापन समितीने यासाठी पुढाकार घेतला होता. ग्रामपंचायतीला स्वमालकीची इमारत नाही, गावात सुसज्ज शाळा तसेच स्मशानभूमी नाही. मालवे पाटीपासूनच्या रस्त्याची दुरावस्था अशा अनेक प्रलंबित विकास कामासाठी एकत्रित पाठपुरावा म्हणून बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सर्वांनुमते इच्छुकांमधून चिठ्ठ्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावचे सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. तर तीन प्रभागात सदस्यांच्या सात जागा आहेत. लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३० इच्छुकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यामध्ये प्रियांका प्रदीप पाटील नशीबवान ठरल्या. तर सदस्यांच्या सात जागांसाठी ४० चिठ्या टाकण्यात आल्या, त्यामधून सात सदस्य निवडण्यात आले. दोन्ही पदांच्या इच्छुकांसाठी बिनपरतीची ठराविक अनामत रक्कम देवस्थान समितीकडे जमा करण्यात आली होती.
सदस्य पदांच्या जागांसाठी नशीबवान ठरलेले प्रभागनुसार सदस्य असे, प्रभाग १- दयानंद पांडुरंग चौगले, शकुंतला श्रीपती चौगले, शितल रामचंद्र चौगले, प्रभाग २- सागर दशरथ पाटील, पूजा रणजीतसिंह पाटील, प्रभाग ३- बाजीराव शिवा पाटील, अनिता सुनील कांबळे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस.पी.आपटे- भोई यांनी काम पाहिले. सरपंच पदी महिला असल्याने संभाव्य उपसरपंच पद पुरुषासाठी देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. त्यासाठी तीन पुरुष सदस्यांच्या चिठ्ठीतून दयानंद पांडुरंग चौगले यांची निवड निश्चित झाली आहे.
हेही वाचा :