पोलिस स्‍मृती दिन : दहशतवादाविरोधात महाराष्ट्रातील 6 पोलिसांनी पत्करले हौतात्म्य! | पुढारी

पोलिस स्‍मृती दिन : दहशतवादाविरोधात महाराष्ट्रातील 6 पोलिसांनी पत्करले हौतात्म्य!

दिलीप भिसे

कोल्हापूर : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…’ महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य… महाराष्ट्र पोलिस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत. कायदा-सुव्यवस्था अखंडित ठेवून समाजातील सर्वच घटकांच्या रक्षणाची जबाबदारी असली, तरी देशविघातक शक्तींचेही पोलिस दलासमोर आव्हान आहे. देशविघातक कारवायांना सडेतोड जवाब देत महाराष्ट्र पोलिस दलाने जगभर यशाची पताका फडकावली आहे.

समाजातील घटकांच्या रक्षणाबरोबरच हिंसाचार, गुन्हेगार, दहशतवाद आणि समाजद्रोह्यांशी प्रखर सामना करावा लागतो. कायद्याचे पालन करणार्‍या नागरिकांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी कर्तव्य निभावत असताना दरवर्षी महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस बांधवांना स्वत:चे प्राणही गमवावे लागतात. दि. 1 सप्टेंबर 2022 ते दि. 31 ऑगस्ट 2023 या काळात देशभरात 189 अधिकारी, कर्मचार्‍यांना वीरगती पत्करावी लागली आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जिगरबाज भूमिपुत्रांचा समावेश आहे.

हौतात्म्य पत्करलेल्या भूमिपुत्रांना सलाम!

गतवर्षात कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्यांमध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन भिकाजी दातीर, हवालदार गौरव नाथुजी खारवाडे, जयंत विष्णुजी शेरेकर, विठ्ठल एकनाथ बादणे, पोलिस नाईक संजय रंगराव नेटके, अजय बाजीराव चौधरी यांचा समावेश आहे.

चिनी सैनिकांचा हल्ला अन्…

आज तब्बल 64 वर्षांपूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव दलाचे दोन जवान लडाख येथून बेपत्ता झाले. आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची 22 शूरवीर आणि जिगरबाज जवानांची एक तुकडी 21 ऑक्टोबर 1959 रोजी शोधमोहिमेवर गेली होती. या तुकडीवर ‘हॉटस्प्रिंग्ज’ या ठिकाणी चिनी सैनिकांनी अचानक शस्त्रानिशी जोरदार हल्ला केला.

देशासाठी 10 जवानांनी देह धारातीर्थी ठेवला

हल्ल्यात शोध पथकातील 10 जवान हुतात्मा झाले. 5 जवान गंभीर जखमी झाले, तर 7 जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. शत्रूशी लढत देताना बहाद्दूर जवानांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर हा दिवस ‘पोलिस स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो.

कर्तव्यनिष्ठेेचे स्मरण

देशातील सर्वच पोलिस मुख्यालयांच्या ठिकाणी मागील एक वर्षाच्या काळात ज्या अधिकार्‍यांसह पोलिसांना कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्या सर्व शूरवीरांना आदरांजली वाहण्यात येते. जिगरबाज जवानांच्या प्राणार्पणानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यात, तसेच कर्तव्यनिष्ठेचे स्मरण करण्यात येते.

महाराष्ट्र पोलिस दलातील जिगरबाज योद्धे!

महाराष्ट्र पोलिस दलाला शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास आहे. अनेक जिगरबाज योद्धांनी देशविरोधी कारवाया, दहशतवाद्यांची आक्रमणे स्वत:च्या निधड्या छातीवर झेलली आहेत. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह 18 पोलिसांनी जीवाची बाजी लावली. सातारा जिल्ह्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी जीवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घालून कुख्यात दहशतवादी अजमल कसाबच्या मुसक्या आवळल्या.

कोल्हापूरच्या राजू जाधव यांनी पोलिस दलाचे नाव रोशन केले!

कोल्हापूरचे भूमिपुत्र फौजदार राजू जाधव यांनी वयाची पंचविशीही ओलांडली नव्हती. पोलिस खात्यात उपनिरीक्षक पदावर राजू जाधव मुंबईतील विक्रोळीला क्राईम ब्रँचचे जिगरबाज अधिकारी म्हणून कार्यरत होते. 16 जानेवारी 1992 रोजी मध्यरात्रीला शीख दहशतवाद्यांशी धैर्याने लढताना ते शहीद झाले. पोलिस दलात भरती झाल्यानंतर अवघ्या साडेचार वर्षांत राजू जाधव यांनी महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव रोशन केले.

Back to top button