Deepotsav : खिद्रापूर कोपेश्वराच्या वर्तुळाकार चंद्रशीलेशी जुळून आला चंद्रप्रकाश

Deepotsav : खिद्रापूर कोपेश्वराच्या वर्तुळाकार चंद्रशीलेशी जुळून आला चंद्रप्रकाश

कुरुंदवाड; जमीर पठाण : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचिन कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार शिलेला व्यापणारा त्रिपुरारी पौर्णिमेच्या शितल चंद्रप्रकाशाचा उजेड रविवारी रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी ६ सेकंदासाठी शिलेवर पडला होता. तर स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी ५४ सेकंदासाठी चंद्र आला होता.

मध्यभागी चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगायोग अनेकांनी अनुभवला.काहीवेळासाठी संपूर्ण मंदिर चंद्रप्रकाशाने उजळून निघाले होते. हा वर्षातून एकदा येणारा दुर्मिळ योगायोग पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक आणि भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर खिद्रापुरातील युवकांनी मंदिरात रांगोळी रेखाटून हजारो दीप लावून दीपोत्सव साजरा केला.

खिद्रापूर येथील रमेश जोशी यांनी रविवारी पहाटे ३ वाजता कोपेश्वराची यथायोग्य विधीवत पूजा केली. सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि त्रिपुरा प्रज्वलन तसेच महाआरती केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भजन किर्तन आणि भरतनाट्यमचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.

कोपेश्वर मंदिराचा परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. मंदिरात आकर्षक रांगोळी रेखाटून त्याभोवती दिवे लावण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे. त्याला चंद्रशीला असे म्हटले जाते. स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून जमिनीवर चंद्रशिलेवर वर्तुळाकार कवडसा पडला होता. हा चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा, जमिनीवरच्या चंद्रशीलेच्या दगडाशी जुळून आला होता. हे दृष्‍य डोळ्यात साठवण्यासाठी उपस्‍थितांनी गर्दी केली होती.

हा वार्षिक योगायोग पाहण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, महाबळेश्वर, कर्नाटक व गोवा राज्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी इतिहास अभ्यासक आणि गावातील युवक कार्यकर्ते भाविक आणि पर्यटकांना हे दृश्य सहजरित्या पाहता यावे यासाठी परिश्रम घेत होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news