

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीच्या शिपायाने चोरी करून खिद्रापूर केडीसी बँकेच्या शाखेत वठवण्यासाठी सादर केलेल्या धनादेशावर तारीख, नाव आणि अक्षरी रक्कम चुकीची असतानाही लिपिक, बँक व्यवस्थापक आणि कॅशियरने तो वठवत १३ हजार ८०० रुपयाची रक्कम दिल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत गुरूवारी (दि.३०) केडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ शिंदे यांनी शाखेची चौकशी लावत चौकशी अधिकारी म्हणून राजू जुगळे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान दैनिक पुढारीच्या दणक्याने खळबळ उडाली असून बँकेचे शाखाधिकारी, लपिक आणि कॅशियरची सखोल चौकशी व्हावी, कॅशियर बुद्धगोंड पाटील हे महिनाअखेरीस निवृत्त होत असून त्यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय त्यांना कार्यमुक्त करू नये, अशी मागणी होत आहे.
खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या दप्तरातील दोन धनादेश चोरी केलेल्या शिपायाने धनादेशावर ग्रामसेवक आणि सरपंचाच्या बोगस स्वाक्षऱ्या मारल्या. मात्र काही अंशी अज्ञान असलेल्या या शिपायाने एप्रिल महिन्यात ३१ तारखा नसतात, हे त्याला माहित नसल्याने तयार धनादेशावर ३१/४/ २००२४ अशी तारीख टाकली. साल २०२४ टाकण्याऐवजी २००२४ असे टाकले आहे. धनादेश वटविण्यासाठी घातलेल्या नावासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शाईचे पेन वापरण्यात आले आहेत. नावात ही आजय सुनील जादधव असे लिहले आहे. तर अक्षरी रक्कम बार हजार आठशे असे लिहले आहे. अशा ४ चूका असतानाही शाखाधिकारी राजाराम बापूसो चौगुले यांनी धनादेश वटविला. बँकेतील क्लार्क, शाखाधिकारी, आणि कॅशियर या तिघांच्या नजरेतून कोणत्याही आजपर्यंतच्या कॅलेंडरवर नसलेली तारीख कशी चुकली, असे वृत्त प्रसिद्ध केले होते.
दरम्यान चौकशी अधिकारी जुगळे हे आज बँकेत हजर झाले असून त्यांनी स्वयं स्पष्ट अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे सादर करणार असल्याचे सांगितले धनादेशावर असलेल्या चुकांच्या बाबतीत विचारले असता त्यांनी दुजोरा दिला.
हेही वाचा :