Fraud Case ! गुंतवणुकीच्या आमिषाने सीएची तीन कोटींची फसवणूक

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चार्टर्ड अकाउंटंटची (सीए) तीन कोटी 40 लाखांची रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत बाणेर येथील चार्टर्ड अकाउंटंटने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे एका खासगी कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतात. ते घरी असताना फेसबुक पाहत होते. या वेळी त्यांना शेअर मार्केटसंदर्भात पोस्ट दिसली. यानंतर फिर्यादी यांनी पोस्टवर क्लिक केले. शेअर मार्केटची माहिती असणार्‍या लंडन हेडक्वार्टर मल्टिनॅशनल कंपनी असे नाव असणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉइन करून घेतले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

फिर्यादी हे जॉइन झाल्यानंतर ग्रुपमधील अनेक सदस्यांनी शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळत असल्याचे मेसेज टाकत होते. फिर्यादी हे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्याने त्यांनी यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी 2 वेळा हा ग्रुपसुद्धा सोडला. मात्र, सायबर चोरट्यांनी परत त्यांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करून घेतले. यानंतर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगून सायबर चोरट्यांनी त्यांचे बँक डिटेल्स भरायला सांगून मोबाईलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी काही टिप्स देत शेअर विकत घ्यायला लावले. फिर्यादी यांनी सुरुवातीला 50 हजार गुंतविले.

यानंतर 1 लाख असे 15 लाख गुंतविले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी 5 लाखांचा परतावा दिला. त्यामुळे फिर्यादी यांचा सायबर चोरट्यांवर विश्वास बसला. यानंतर सायबर चोरट्यांनी विविध 6 बँक खाते फिर्यादी यांना पाठवून पैसे पाठवायला सांगितले. फिर्यादी यांनी 16 ट्रान्जेक्शनच्या माध्यमातून 3 कोटी 40 लाख रुपये सायबर चोरट्यांना पाठविले. यानंतर फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर शेअरमध्ये फायदा झाल्याचे दिसत होते. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता सायबर चोरट्यांनी त्यांना यातील काही रक्कम ही धर्मादाय संस्थेला दान करावी लागेल, असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांनी त्यांना डाऊनलोड करायला सांगितलेल्या अ‍ॅपसंदर्भात माहिती घेतली तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बँकेकडून कर्ज घेतले

फिर्यादी हे पुण्यातील नामांकित कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट आहेत. फिर्यादी यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 2 कोटींपेक्षा जास्त पैसे हे दोन सहकारी बँक आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news