आदमापुरात भक्तांना सोसावा लागतो वैशाख वणवा…! बसस्थानकाअभावी होतेय गैरसोय!

आदमापुरात भक्तांना सोसावा लागतो वैशाख वणवा…! बसस्थानकाअभावी होतेय गैरसोय!

मुदाळतिट्टा; प्रा. शाम पाटील : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना वैशाख वनवा सोसावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिला उड्डाणपूल डाम डौलात उभा राहिला. पण हा उड्डाणपूल उभारत असताना बाळूमामा मंदिराशेजारी असणारे बस स्थानक अतिक्रमणामध्ये काढण्यात आले. सध्या येथे बस स्थानक नसल्याने अनेक अडचणींचा सामना भाविकांना करावा लागत आहे.

आदमापूर हे ठिकाण बाळूमामांच्यामुळे नावारूपाला आले. महाराष्ट्र, कर्नाटकात १९ ठिकाणी फिरत असणारी बाळुमामाची बकरी आदमापूर येथे बाळूमामाच्या भक्तांची गर्दी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. जशी बकरी पुढे फिरत जातात तसे बाळूमामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. भाविकांच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाळूमामा देवालय समिती या ठिकाणी भक्तनिवास, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, दर्शन मंडप, अन्नछत्र, सभागृह, दर्शन लाईन अशा सेवा सुविधा उपलब्ध करून दित आहे. भक्तांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था व्हावी यासाठी मिळेल त्या ठिकाणी जमिन खरेदी केली आहे. त्यामुळे वाहन पार्किंग प्रश्नही थोड्या प्रमाणात मार्गी लागला आहे.

सध्या बाळूमामांच्या दर्शनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून अनेक ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्या आदमापूर येथे मुक्कामी सोडल्या जातात. त्यामुळे भाविकांची प्रवासाची सोय चांगली होत आहे. पण या ठिकाणी बस स्थानकच नसल्याने भक्तांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये एसटीची व प्रवासाच्या साधनांची वाट पाहत उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस उभारावे लागत आहे. बसण्यासाठी पिकप शेड नाहीत. त्यामुळे ताटकळत उभे राहावे लागत आहे. दोन्ही बाजूस पिकप शेड बस स्थानकाची तात्काळ उभारणी करणे गरजेचे आहे. याचबरोबर या ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे येथे बस प्रवासी वर्गाच्या इशाऱ्यावरच थांबतात याची तात्काळ दखल घेऊन विभाग नियंत्रक कोल्हापूर व बाळूमामा देवालय समितीकडून उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस बस थांबा असे फलक लावणे गरजेचे आहे.

आदमापूर मुरगूड रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. परिणामी वाहनांच्या वेगावर अजिबात मर्यादा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे अपघात होत आहेत. उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर तयार करण्याची मागणी केली जात आहे.

बाळुमामा मंदिर कुठं आहे…

आदमापूर येथे मुरगुड मुदाळतिट्टा मार्गावर झालेल्या उड्डाणपुलामुळे निढोरी व मुदाळतिट्टा येथून येणारी वाहने सरळ उड्डाणपूलावरुन पुढे जातात. बाळूमामा मंदिर कुठे आहे असे विचारतात. त्यावेळी त्यांना पुन्हा माघारी वळावे लागते. भक्तांची ही गैरसोय होऊ नये म्हणून बाळूमामा मंदिराच्या दोन्ही बाजूस एक किलोमीटर अंतरावर बाळूमामा मंदिराकडे असे दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. देवालय समितीने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ काँक्रिटीकरणात हे दिशादर्शक फलक उभा करावेत, अशी मागणी भक्तांतून होत आहे.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news