कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेच्या युवासेना अध्यक्ष पदावर ऋतुराज क्षीरसागर यांची नियुक्ती | पुढारी

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेच्या युवासेना अध्यक्ष पदावर ऋतुराज क्षीरसागर यांची नियुक्ती

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात शिवसेनेची भक्कम बांधणी होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकहिताच्या निर्णयाचा धडाका लावला असून, त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. युवा वर्गाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना अंगीकृत युवा सेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. युवा वर्गाचे रोजगार, शिक्षणाशी निगडीत प्रश्नाला वाचा फोडून युवा वर्गाला न्याय देण्याचे काम युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा विस्तार होत असताना, युवासेनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी युवासेना कार्यकारणीचा विस्तार करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात युवकांचे प्रश्न सातत्याने मांडणाऱ्या आणि सामाजिक कार्याच्या जोरावर युवकांचे नेतृत्व बनलेल्या ऋतुराज राजेश क्षीरसागर यांची युवासेनेच्या कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाच्या “अध्यक्ष” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यनेते व मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सचिव भाऊ चौधरी, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना लोकसभा अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्या आहेत.

युवासेना कोल्हापूर, हातकणंगलेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झालेले ऋतुराज क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न समिती सदस्य आणि शिवसेना सातारा, सांगली लोकसभा संपर्कप्रमुख राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. गेली १२ वर्षे युवा सेना, नो मर्सी ग्रुप या माध्यमातून ते युवकांचे नेतृत्व करत आहेत.

विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, डोनेशन विरोधी मोर्चा, रोजगाराचे प्रश्न यासह शाळा- महाविद्यालयांवर आरोग्य शिबिरे, मैत्रीयुवा महोत्सवाच्या माध्यमातून व्यसन मुक्ती संदेश अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ऋतुराज क्षीरसागर यांनी युवा वर्गात आपली स्वतंत्र छाप पाडली आहे. आगामी काळात युवा रोजगार निर्मिती, शाळा- कॉलेज प्रवेश प्रक्रिया, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या दोन्ही मतदार संघात युवा वर्गाची संघटनात्मक बांधणी करून युवकांचे जाळे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यातून शिवसेनेचे दोन्ही मतदारसंघात प्राबल्य वाढविण्यास मदत होणार आहे.

पक्षनेतृत्वाच्या विश्वासास सार्थ काम करून, दोन्ही मतदारसंघात शिवसेना – युवासेनेचे प्राबल्य वाढविणार

गेली ३७ वर्षे आमचे कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी मार्गक्रमण करत आहे. याचीच पोहोचपावती म्हणून राजेश क्षीरसागर यांच्यावर विविध शासकीय पदांसह पक्षीय पातळीवरील महत्वाच्या पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. आमच्या कुटुंबांवर पक्षनेतृत्वाचा असणाऱ्या विश्वासास तडा जावू न देता कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात युवकांचे जाळे निर्माण करून शिवसेना – युवासेनेचे प्राबल्य वाढविणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त युवा सेना कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.

Back to top button