

चंदगड : चंदगड व हुक्केरी तालुक्याच्या सीमेवरील यर्तनहट्टी (ता. चंदगड) गावाशेजारी असणाऱ्या डोंगरात गावठी दारूभट्टी वर कोवाड पोलीस व उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांनी संयुक्त कारवाई करत उध्वस्त केली. याप्रकरणी सुमारे ६१ हजार ८०० रुपयांचे रसायन व अन्य मुद्देमाल जप्त करून रसायन नष्ट केले.
याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंदा नाईक यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संतोष बसवाणी नाईक, करण बसवाणी पाटील, बसवाणी आप्पालाल सनदी (सर्व रा. यर्तनहट्टी, ता. चंदगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यर्तनहट्टी गावच्या हद्दीत गड्याळ नावाच्या डोंगराजवळील ओढ्यावर कलाप्पा बंबरर्गी यांच्या शेताजवळ सदर गावठी दारूची हातभट्टी अनेक महिन्यांपासून सुरू होती. याची खबर कोवाड पोलिसाना मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई केली. प्रत्येकी ५० लिटरचे रसायन भरलेले १२ गॅलन व अन्य कच्चे रसायन असा ६१ हजार ८०० रुपयांचे रसायन व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उत्पादन शुल्क खात्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित फेरीवाले व ए. बी. राणे, कोवाड पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. गेंगजे, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा नाईक निलेश कोळी संजय कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.