

Latur Udgir Ganja seized
उदगीर : उदगीर शहरात पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. हॉटेल एवन ते मोंढा रोडवरील साईनाथ मिर्ची मसाला उद्योग या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी २४ किलो ७४२ ग्रॅम वजनाचा बेमालूम सुक्या गांजाचा साठा जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ७ लाख ४२ हजार रुपये इतकी आहे.
ही कारवाई १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:४० वाजता करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, लातूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख (वय ३४) यांच्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. उदगीर दक्षिणेस सुमारे १ किमी अंतरावर असलेल्या शिंदे यांच्या साईनाथ मिर्ची मसाला उद्योग दुकानात ही कारवाई पार पडली.
छाप्यादरम्यान फुलेनगर, उदगीर येथील रहिवासी शुभरत्न उर्फ कपिल बाबुराव गायकवाड (वय १९) हा तरुण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गांजा विक्रीच्या उद्देशाने हा साठा बाळगताना आढळून आला. त्याचा पूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक एम. के. गायकवाड यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे (उदगीर ग्रामीण तसेच उदगीर शहर प्रभारी) हे करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थ तस्करीवर आळा बसेल, असे मानले जात आहे.