Gokul Milk Price Hike : मुंबईमध्ये अमूल आणि मदर डेअरीने दूध विक्री दरात वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) देखील दूध विक्री दरात वाढ करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात संचालकांनी निवेदन दिले असून, येत्या दोन दिवसांत यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महत्त्वपूर्ण संकेत गोकुळचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले.
गोकुळ दूध संघाला गेल्या आर्थिक वर्षात २४ कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे, अशी माहिती देत राजेश पाटील पुढे म्हणाले की, "हा झालेला तोटा कसा भरून काढता येईल, याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. मुंबईतील दूध दरवाढीच्या संदर्भाने संचालकांनी मला निवेदन दिले आहे. आम्ही सर्व संचालक एकत्रितपणे चर्चा करून येत्या दोन दिवसांत दूध दरवाढीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ."
राजेश पाटील म्हणाले की, मुंबईतील वितरणकांसोबत चर्चा करून दूध दरवाढीचा निर्णय घेणार असून यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. गोकुळच्या दूध उत्पादकांना सुद्धा बुधवार पर्यंत गोड बातमी देणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन गोकुळ दूध दरवाढ पुढील आठवड्यात होणार. दूध उत्पादक आणि ग्राहक यांच्या हिताचे निर्णय घेणार, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोकूळ दूध संघाला मागील ६ महिन्यात २४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आता यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. यामील कारणे कोणती याचा अभ्यास करुन उपाययोजना केल्या जातील, असेही राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
गोकुळ अध्यक्ष निवड ही राज्यत चर्चेचा विषय ठरली होती. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संघाच्या पहिल्या बैठकीनंतर राजेश पाटील काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. राजेश पाटील म्हणाले की, आज सर्व संचालक उपस्थित होते त्यामुळे मी आज सतेज पाटील यांना स्वतः फोन करून त्यांचे आभार मानणार आहे.