

Satej Patil Gokul Election : "माझ्यावर टीका करताना स्वर्गीय डी. वाय. पाटील यांचे नाव घेण्याची गरज नव्हती. तुम्ही माझ्यावर टीका करा; पण स्वर्गीय डी. वाय. पाटील यांचे नाव कसे घेता? तुमचा काचेचा महाल झाला आहे. माझ्यावर एकेरी भाषेत बोलून त्यांनी महाराष्ट्रात मला प्रसिद्ध केले आहे. चंद्रकांत पाटील जेवढे मोठे तेवढी त्यांची बौद्धिक पातळीही मोठी आहे," अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आज (दि. १०) पत्रकार परिषदेत केली. सरकारी यंत्रणेतून मला धमकी देऊ नका. मीही पाटील आहे. राजकारणात लढाई ही निवडणुकीतून होते. धमक असेल तर २०२९ मध्ये जिल्ह्यातील १० मतदारसंघातून लढाई लढा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
अध्यक्ष निवडणुकीत कोरमचा आग्रह धरणे चुकीचे आहे. कोरमचा विषय होता तर तुमच्या १२ संचालकांना का पाठवलं नाही. गोकुळची सत्ता मिळवण्यासाठीच हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणून अध्यादेश काढला. आम्हाला न्यायालयातच दाद मागावी लागली. आता न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
गोकुळ अध्यक्ष निवडणुकीत महायुती सरकारने बहुमताचा अनादर केला आहे. मुश्रीफ थेट धमकी देत आहेत की, 'आमच्या विरोधात निर्णय गेला तर १३ जणांना घरी बसवू, तुमची बंटी पाटील यांची शेवटची सभा ठरेल', अशी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यावरूनच सरकार यंत्रणांचा किती गैरवापर करत आहे हेही समोर आले आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणतात, 'मी बंटी पाटीलच राहिलो, साहेब झालो नाही.' मी एवढंच सांगतो, महाराष्ट्रात माझी ओळख बंटी पाटीलच आहे. साहेब नसलो तरी चालेल, असा टोलाही त्यांनी लगावला. आता गोकुळमध्ये चुकीचे काम करण्याचा प्रयत्न झाला तर आमचे संचालक विरोध करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता आम्हाला न्यायालयातच दाद मागावी लागली. कोल्हापूरमध्ये सोमवारी काढण्यात आलेल्या विराट मोर्चाने महायुतीला धडकी भरली आहे. कोल्हापुरातील जनता रस्त्यावर उतरली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सामान्य माणूस या मोर्चात सहभागी झाला होता.
आता गोकुळमधील महायुतीचे समर्थन करण्यासाठी ट्रोलिंग टीम सक्रिय झाली आहे. ' एका स्थानिक चॅनेलला गोकुळमधून जाहिराती दिल्या जातात', असा आरोप भाजपनेच केला होता. याच चॅनेलच्या ऑफिसमधून ही ट्रोलिंग टीम सक्रिय झाली आहे, असा आरोपही सतेज पाटील यांनी केला.