गडहिंग्‍लज : दुगूनवाडी, लिंगनूर भागात हत्तीचा भरवस्तीत प्रवेश; केळी, ऊस पिकांचा फडशा (Video)

हत्तीचा भरवस्तीत प्रवेश
हत्तीचा भरवस्तीत प्रवेश

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा गडहिंग्लज तालुक्यातील दुगूनवाडी भागात काल (मंगळवार) रात्रीपासून चारा पाण्याच्या शोधात आलेल्या हत्तीने भरवस्तीत ठाण मांडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री दुगूनवाडी गावातील महादेव मंदिराजवळ महिलेला हत्तीचे दर्शन झाले. तिने आरडाओरडा केल्यावर ग्रामस्थांनी धाव घेतली. रात्रभर हत्तीने या भागात केळी, ऊस पिकांचा फडशा पाडला आहे.

रात्रीच त्याने मुंगूरवाडी गावाजवळील ओढ्यातून लिंगनूर तर्फ नेसरी या गावात प्रवेश केला होता. सकाळी भरवस्तीत त्याने प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली. दैनंदिन कामाच्या निमित्ताने बाहेर पडणार्‍या ग्रामस्थांची यामुळे तारांबळ उडाली. मात्र हत्तीने शांतपणे गावांतील रस्त्यांवरुन मार्गक्रमण केले. यावेळी काही हुल्लडबाजांनी ओरडाओरडा करीत गलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्तीने संयम बाळगत कोणाचेही नुकसान केले नाही.

उन्हाचा कडाका वाढला असून, चारा-पाण्याच्या शोधात त्याने या परिसरात ठाण मांडली असण्याची शक्यता आहे. दरम्यान सकाळी ११ नंतर हत्तीने हेब्बाळ-जलद्याळकडे मार्गक्रमण केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हुल्लडबाजांमुळे हा हत्ती बिथरण्याची शक्यता असून, वनविभागाने तातडीने या हत्तीला सुरक्षित क्षेत्रात पाठवावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news