कुस्ती संघाच्या अध्यक्षांविरोधात प्राथमिक तपास आवश्यक : तुषार मेहतांची सर्वोच्च न्यायालयात माहिती | पुढारी

कुस्ती संघाच्या अध्यक्षांविरोधात प्राथमिक तपास आवश्यक : तुषार मेहतांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्राथमिक तपास आवश्यक आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज (दि. २६) सर्वोच्च न्यायालयात दिली. सिंह यांच्याकडून करण्यात आलेल्या लैंगिक छळवणुकीमुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला कुस्तीपटूंनी केली आहे. याचिकेवर सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले, तर गुन्हा दाखल केला जाईल, असे देखील मेहता यांनी न्यायालयात स्पष्ट केले. कुस्तीपटूंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मेंशन केले. कुस्तीपटू आंदोलन करीत आहेत.७ महिला कुस्तीपटूंनी तक्रार केली आहे. परंतु, गुन्हा दाखल करण्यास पोलीस तयार नाहीत. सिंह यांच्याविरोधात पॉस्कोचे आरोप लावण्यात आले आहेत, असे सिब्बल यांनी सरन्यायाधीशांच्या निदर्शनात आणून दिले.

यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही खटला चालवला पाहिजे. कायद्यातील दुरुस्तीनंतर गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांवर खटला चालवला जावू शकतो, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. याचिकाकर्ते अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करतील, असे सिब्बल म्हणाले.

कुस्तीपटू विनेश फोगाटसह सात महिला कुस्तीपटूंनी याचिका दाखल करीत कुस्ती संघाच्या अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. २१ एप्रिलरोजी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता.

आंदोलकांचा रस्त्यावरच सराव

गेल्या चार दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आज सकाळी रस्त्यावरच कुस्तीचा सराव केला. यावेळी आंदोलनस्थळी बराच पोलीस बंदोबस्त होता. महिला कुस्तीपटूंनी यावेळी लहान मुलांना कुस्तीचे धडे दिले. आंदोलकांना आता हरियाणातील खाप पंचायतचे समर्थन मिळाले आहे. गुरूवारी (दि. २७) खाप पंचायत आंदोलनात सहभागी होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button