

पाचगाव : पाचगाव (ता. करवीर) येथील पोवार कॉलनीत किरकोळ कारणातून सख्ख्या भावाने लहान भावाचा खून केला. सागर जयसिंग कुंभार (वय 35, रा. पोवार कॉलनी, पाचगाव) असे खून झालेल्या भावाचे नाव असून वैभव जयसिंग कुंभार (40) यास याप्रकरणी करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुंभार कुटुंब मूळचे घरपण (ता. पन्हाळा) येथील असून वडिलांच्या नोकरीनिमित्त पोवार कॉलनी येथे 25 वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. वडील जयसिंग कुंभार हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने अनुकंपा तत्त्वाखाली मोठा भाऊ वैभव यास नोकरीला मिळाली. वैभव व्यसनाच्या आहारी गेला होता. नोकरीवर अनियमित जात होता. त्यामुळे आर्थिक चणचण व कर्ज असल्याने दोन भावांमध्ये नेहमी वाद होत होता. मंगळवारी या वादाचे पर्यवसान मारामारीत झाल्याने वैभवने दुचाकीच्या चेन कव्हरने वर्मी घाव घातल्याने सागरचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. मृत सागर कुंभारच्या पश्चात आई, पत्नी व चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
ही घटना समजताच करवीरचे उपाधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर जाधव, युसूफ इनामदार यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून केला.