

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीच्या सूळकूड पाणी योजनेला कडाडून विरोध करण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार बिद्री येथील काळम्मावाडी पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व दूधसाखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील होते. यावेळी दि. २४ सप्टेंबर येथे बिद्री येथे परिसरातील शेतकर्यांचा संघर्ष निर्धार मेळावा तसेच दि. २ ऑक्टोबरला काळम्मावाडी ते सुळकूडपर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचे ठरविण्यात आले.
बाबासाहेब पाटील म्हणाले, आमच्या हक्काच्या पाण्यासाठी हा आमचा लढा आहे. जर इचलकरंजीला काळम्मावाडीतून पाणी दिले तर दूधगंगा नदी काठावरील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. धरणाची गळती व कमी पाणी साठा यामुळे ऐन उन्हाळ्यात झळ सोसावी लागली आहे. इचलकरंजीच्या नेत्यांनी फेरविचार करून अन्य ठिकाणावरून पाणी आणणे सोयीचे होणार आहे.
यावेळी धनराज घाटगे म्हणाले, इचलकरंजीला वारणा किंवा कृष्णेवरून पाणी आणणे सोयीचे असताना इचलकरंजीचे नेते आडमुठे धोरण ठेवत आहेत. पण दूधगंगेचे पाणी कदापि पाणी दिले जाणार नाही. त्यासाठी संघर्ष तीव्र कaरीत आहोत. दरम्यान, संघर्ष समितीने बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांची भेट घेतली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील, मनोज फराकटे, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब पाटील, नंदकुमार पाटील, धनराज घाटगे यांनी लढा तिव्र करण्यासाठी शेतकऱ्यांत जागृती करण्यासाठी पुढे असणार असल्याचे सांगितले.बैठकीस कैलास जाधव, सांगाव, दत्तवाडचे चंद्रकांत यादव, दत्तात्रय पाटील, सिद्धनेर्ली सागर कोंडेकर (शेतकरी संघटना) अण्णा पोवार, शहाजी गायकवाड, राजू चौगुले आदी उपस्थित होते.
हेही वाचा :