धाराशिव : मुरूममध्ये गेल्या ७६ वर्षापासून बसतोय पर्यावरण पूरक लाकडी गणपती | पुढारी

धाराशिव : मुरूममध्ये गेल्या ७६ वर्षापासून बसतोय पर्यावरण पूरक लाकडी गणपती

मुरूम, पुढारी वृत्तसेवा : उमरगा तालुक्यातील मुरूम येथे अशोक चौक गणेश मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. या मंडळाचे खास वैशष्ट्ये म्हणजे श्री गणेशाची मूर्ती या पर्यावरण पूरक लाकडी गणपती असून गेल्या ७६ वर्षांपासून एकाच गणपती मूर्तीची स्थापना केली जाते.

शहरातील मध्यवर्ती अशोक चौक गणेश मंडळाची गणपती स्थापना १९४७ झाली. त्यावेळी मराठवाडा हे निजाम सरकारच्या हैद्राबाद संस्थानात असल्याने हा परिसर स्वातंत्र्य भारतात आणखी विलीन झाला नव्हता. त्याकाळी असे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जात  नव्हते. त्यामुळे येथील लोकांनी एकत्र येऊन एखादा सार्वजनिक उपक्रम साजरा करून लोकांना एकत्रित करता यावे, हा उद्दात्त हेतू समोर ठेऊन शहरातील त्याकाळी मुख्य बाजार पेठ असलेल्या अशोक चौक येथील व्यापारी बांधवांनी एकत्रित येत गणेश मंडळाची स्थापना केली.

गणपती मूर्ती उपलब्ध नसल्याने एका कॅलेंडर वरील फोटो घेऊन पहिल्यांदा उत्सव साजरा करण्यात आला. नंतर शहरातील किसान चौक येथील किसान सुतार नामक कारागीर यांनी लाकडा पासून गणेशाची मूर्ती साकारली. ते आतागायत सतत ७६ वर्षे एकच गणेश मूर्ती ठेवून गणेशोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तर अखंड लाकडात ही मूर्ती बनविण्यात आली आहे. यावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले आढळते.

आमची मूर्ती ही पर्यावरण पूरक असून गेल्या ७६ वर्षांपासून एकच गणेश मूर्ती स्थापना करण्यात येते. दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी गणेशोस्तव साजरा करण्यात येतो. याहीवर्षी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम ,बाल गणेश लीला देखावा यासह विविध कार्यक्रमांनी गणेशोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
– रामलिंग आंबूसे
अध्यक्ष अशोक चौक गणेश मंडळ

हेही वाचलंत का?

Back to top button