

Ladki Bahin Yojana
कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
'लाडकी बहीण'बाबत नियोजन केले आहे. वेळच्या वेळी पैसे कसे दिले जातील याची काळजी घेतली जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील अडकुर येथे माजी आमदार राजेश पाटील यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला अजित पवार आज शुक्रवारी उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी ते शेतकरी कर्जमाफीवरही बोलले. 'जमत नाही तर आश्वासन कशाला दिले?', असा सवाल राजू शेट्टी यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी, 'मी काही आश्वासन दिलं होतं का? मी कधी बोललो आहे का?' असे दोन ते तीनवेळा पत्रकारांशी बोलताना प्रतिप्रश्न केला.
पीकविम्याबाबत ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्याबद्दल अभिमान आहे. खताची बचत, पाण्याची बचत यासह अनेक चांगल्या भावनेने कार्यक्रम घेत आहोत. शेतकऱ्यांना पीक विमा देणार असून त्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा केली आहे.
विधानसभेवेळी चंदगडची आमची जागा दुर्दैवाने गेली. बंडखोर उमेदवार निवडून आला. आमचे कार्यकर्ते कमी पडले. कोल्हापुरात महायुतीच्या सर्व जागा आल्या. फक्त चंदगडची जागा गेली, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य केले. दहशतवाद्यांनी घात केला. त्यांचा बदला घ्यायचा अशी माझी आणि सर्व भारतीयांची इच्छा आहे. यावर पीएम मोदी मार्ग काढतील. सर्व पीडीत कुटुंबियांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे, असे ते म्हणाले.