सांगली : लाडकी बहीण योजनेचे मानधन एकवीसशे रुपये करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली.
येथील दैवज्ञ भवनमध्ये शुक्रवारी सांगली जिल्हा शिवसेना (शिंदे) महिला आघाडीच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. गोर्हे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्क प्रमुख सुनीता मोरे होत्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे आदी उपस्थित होते.
डॉ. गोर्हे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेचा महिलांंना चांगला फायदा झाला आहे. महिलांनी बचत गट काढून लहान, लहान उद्योग सुरू केले आहेत. त्यांना बँकांनीही सहकार्य दिले आहे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्यांचा सामान्य जनतेला फायदा करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. लाडकी बहीण योजनेचे मानधन एकवीसशे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी पदाधिकार्यांनी प्रयत्न करावेत, यासाठी आवश्यक ते पाठबळ आपण देऊ.
स्वागत सुनीता मोरे यांनी केले. यावेळी महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब हजारे आदींंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. यावेळी ज्योती दांडेकर, अर्चना माळी, मनीषा पाटील, आशा पोतदार आदी उपस्थित होत्या.