

कळे; पुढारी वृत्तसेवा : धामणी खोऱ्यातील पणुत्रे (ता. पन्हाळा) येथे शेतातील जनावरांच्या गोठ्याच्या दारात बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडला. गुरुवारी (ता.१७) रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी पाटील यांचा आकुर्डे-पणुत्रे दरम्यानच्या 'बिबीची खडी' नावाच्या शेताजवळ जनावरांचा गोठा आहे. रात्रीच्या वेळी ते रोज गोठ्याच्या दारात आपला पाळीव कुत्रा बांधतात. गुरुवारी रात्री या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करुन त्याचा फडशा पाडला. शुक्रवारी (ता.१८) सकाळी जनावरांचे दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेल्यावर त्यांना कुत्रा मृतावस्थेत आढळून आला.
दरम्यान, याची माहिती वन विभागाला दिली. वनपाल नाथा पाटील, वनरक्षक संगीता देसाई, वनसेवकांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. यावेळी या परिसरातील शेतामध्ये बिबट्याचे ठसे आढळून आले. परिसरातील शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. या घटनेमुळे धामणी खोऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा;