कोल्हापूर : अब्दुल लाट येथे उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘युवा संकल्प मेळावा’

स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी

अब्दुल लाट; पुढारी वृत्तसेवा: अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  साेमवार, १ ऑगस्ट रोजी 'युवा संकल्प मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकडे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तथा काही अंशी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

राज्यातील सत्तांतर नाट्य, महापूर ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, एफआरपी, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने व शिरोळ तालुक्याचे विद्यमान अपक्ष आमदार व माजी आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यांनी शिंदे गटाला दिलेला थेट पाठींबा, गत काळात महाविकास आघाडीचे राज्यात सत्ता असताना महाविकास आघाडीतून मिळालेली वागणूक तथा नगर व महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुका यामुळे स्वाभिमानीच्या या 'युवा संकल्प मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था तसेच काही नगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानीचे मतदान निर्णायक ठरते.

यासोबत येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार की भाजपसोबत जाऊन युती करणार ? किंवा स्वाभिमानी स्वतंत्रपणे लोकसभा लढवणार हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदान हे अनेक ठिकाणी निर्णायक ठरते.
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानीची कोणती भूमिका असेल? याचाही थेट परिणाम लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांवर होणार आहे. यामुळे 'युवा संकल्प मेळाव्यातून' नव्या युवकांना संधी देवून पुढची कोणती भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार याकडे तालुक्यासह जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहेत.

या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रा. जालंधर पाटील, अनिल मादनाईक (सावकार), वैभव कांबळे, सुमती शेट्टी, शितल कुरणे, राम शिंदे, विठ्ठल मोरे आदींसह स्वाभिमानी युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी युवा आघाडीकडून देण्यात आली.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news