

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल हे घटनात्मक पद असून ते राज्याचे पालक असतात. त्यांनी कायम विकासात्मक आणि एकात्मतेचे वातावरण वाढीस लागेल, अशी वक्तव्य व कृती करणे अपेक्षित असते. मात्र, सध्याचे राज्यपाल यांच्या चुकीच्या वक्तव्याने सातत्याने राज्यातील व देशातील बंधुभावाचे नाते बिघडले असून हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार थोरात म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मात्र, मुंबईबाबत राज्यपाल महोदयांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर राज्यपाल हे पद घटनात्मक आहे. राज्याचे ते पालक असतात. त्यांनी कायम एकात्मतेचे व चांगले वातावरण राहील, यासाठी वक्तव्य केली पाहिजे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील राज्यपाल महोदयांनी सातत्याने चुकीचे वक्तव्य करून राज्यातील व देशातील बंधुभाव बिघडवण्याचे काम केले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईत येणारा कोणताही माणूस असो तो गुजराती किंवा राजस्थानी असला तरी तो देशाचा नागरिक आहे.