टाकवे बुद्रुकमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव

टाकवे बुद्रुकमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा :  टाकवे बुद्रुक हे आंदर मावळातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. गावची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात आहे; मात्र गावामध्ये स्वच्छतागृहे, शौचालये नसल्याने ग्रामस्थांची तसेच विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.
टाकवे बुद्रुक परिसरात मोठी औद्योगिक वसाहत आहे; तसेच आठवडे बाजारदिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्रथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महविद्यालय आहे.

त्यामुळे परिसरात ग्रामस्थांची सतत ये-जा असते; मात्र या ठिकाणी येणार्‍या ग्रामस्थांची स्वच्छतागृह तसेच शौचालये नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन 2005 मध्ये एस. टी. स्टॅन्डजवळ स्वच्छतागृह बांधले होते; परंतु स्वच्छता गृहाची स्वछता कर्मचारी करत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती. दुर्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे स्वच्छतागृह, शौचालय स्वच्छतेची मागणी केली होती; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनीच या स्वच्छतागृहास टाळे ठोकले आहे. हे स्वछतागृह बंद असल्याने परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. परिसरातील अनेक महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार करूनही लक्ष का दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाकवे बुद्रुक ही आंदर मावळातील प्रमुख बाजार पेठ असून, या बाजारपेठेत चाळीस गावे, वड्या वास्त्यांवरील लोकांची ये जा सुरू असते. एवढ्या मोठ्या बाजार पेठेत एकच स्वछतागृह आहे; मात्र सध्या ते ही बंद असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीने एस.टी. स्टॅन्ड व खंडोबा चौक परिसरात स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

बाजारपेठ परिसरात नवीन स्वच्छतागृहे उभारण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने स्वच्छतागृह उभारण्यात अडचण निर्माण होत आहे. सध्या फायबर शौचालय ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहे. जागा उपलब्ध झाल्यास स्वच्छतागृह तसेच शौचालये उभारण्यात येणार आहेत.
भूषण असवले, सरपंच, टाकवे बुद्रुक

जुन्या स्वच्छतागृहाचे दुरुस्तीचे काम दिले असून स्वच्छतागृह लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.
एस.बी. बांगर, ग्राम विकास अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news