पिंपरी : वृक्षतोडीबाबत वन विभागाकडून चौकशीचे आदेश | पुढारी

पिंपरी : वृक्षतोडीबाबत वन विभागाकडून चौकशीचे आदेश

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चिंचवड-बिजलीनगर येथील एमआयडीसी कॉलनी परिसरात वीसपेक्षा अधिक पक्ष्यांचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच, या ठिकाणी झालेल्या वृक्षतोडीमुळे परिसरातील मोठा हरितपट्टा नाहीसा होत चालला आहे. त्याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश विभागीय वन अधिकारी (संरक्षण) प्रिया मलवे यांनी दिले आहेत. एकेकाळी गर्द झाडी, खळखळता ओढा आणि मोठ्या प्रमाणात असणारा पक्ष्यांचा अधिवास म्हणून लौकिक असणार्या चिंचवड-बिजलीनगर येथील एमआयडीसी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून झाडांची नियोजनबद्ध कत्तल आणि जिवंत झाडे जाळण्याचा प्रकार होत आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा नष्ट झालेली दिसून येत आहे. पर्यायाने, राखी धनेश, विविधरंगी चिमण्या, पोपट, बगळे, घार, साळुंकी, टिटवी, ढोकरी, करकोचा, पाणकोंबडी, कोकीळ, पावशा, भारद्वाज, गव्हाणी घुबड, धीवर (खंड्या), बुलबुल, सुगरण, कोतवाल यांच्यासह वीसपेक्षा अधिक पक्ष्यांचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक पुढारीमध्ये एमआयडीसी कॉलनीत पक्ष्यांचा अधिवास होतोय नष्ट या शिर्षकान्वये 22 जून रोजी प्रसिद्ध झाले होते. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास गटाने केलेल्या निरीक्षणात ही गंभीर बाब उजेडात आली होती. विजय पाटील यांनी याबाबत वन विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश विभागीय वन अधिकारी (संरक्षण) प्रिया मलवे यांनी मुख्य वनसंरक्षक (पुणे) यांना दिले आहेत. पाटील यांनी याबाबत आपले सरकार पोर्टल आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 यांच्याकडे नियमबाह्य विनापरवाना वृक्षतोडीबाबत तक्रार केली होती. त्याची दखल घेत चिंचवड पोलीस ठाण्याकडून हा तक्रार अर्ज पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी महापालिका उद्यान विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Back to top button