'रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास’ मार्गदर्शन सत्राचे आयोजन | पुढारी

'रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास’ मार्गदर्शन सत्राचे आयोजन

कोल्हापूर , पुढारी वृत्तसेवा : आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योजकता विकास व रोजगारनिर्मितीस चालना देणे गरजेचे आहे. मागील दीड-दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या संकटात अनेकांना रोजगार गमवावा लागला होता. अशाच रोजगाराच्या प्रतीक्षेत असणार्‍या युवावर्गासाठी दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास’ मार्गदर्शन सत्र घेण्यात येणार आहे.

बुधवारी (दि. २९) सकाळी 9.30 वाजता यशवंतराव चव्हाण (के. एम.सी.) कॉलेज येथे ‘रोजगार नोंदणी कार्ड व कौशल्य विकास’ हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी मार्गदर्शन करणार आहेत.

उपक्रमात शासकीय रोजगार कार्डची नोंदणी कशी करावी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कार्ड निर्मितीची ऑनलाईन सुविधा यासह अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार कर्ज योजनेसह इतर शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास केंद्रामार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहितीही दिली जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रोजगारासाठी प्रयत्नशील असलेल्या अन्य इच्छुक युवक-युवतींनी उपक्रमात सहभागी व्हावे. रोजगार कार्डची नोंदणी विनामूल्य करून दिली जाईल, असे आवाहन संयोजकांतर्फे केले आहे.

रोजगार नोंदणी कार्डाची का आवश्यकता?

शासकीय-निमशासकीय कार्यालयात नोकरीसाठी अर्ज करताना, स्वयंरोजगारासाठी शासकीय अर्थसहाय्य प्राप्तीसाठी तसेच खासगी आस्थापनेत नोकरी मिळवण्यासाठी, रोजगार मेळावा सहभागाकरिता या नोंदणी कार्डची आवश्यकता भासते.

हेही वाचलंत का? 

Back to top button