हजारो किलोमीटरचे अंतर कापून ‘अमूर ससाणा’ पालघरात दाखल

हजारो किलोमीटरचे अंतर कापून ‘अमूर ससाणा’ पालघरात दाखल
Published on
Updated on

डहाणू : विनायक पवार

वर्षभरात सर्वाधिक लांबवर स्थलांतर करणारा (22,000 कि.मी हून अधिक) अशी विशेष ओळख असलेला 'अमूर फाल्कन' हा ससाणा पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर कापून पालघर जिल्ह्यात विसावला आहे. पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी आणि पाणथळ भागात तीनशेहून अधिक देशी-विदेशी पक्ष्यांचा वावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पालघरमधील पर्यावरण विज्ञानचे विद्यार्थी वैभव हलदीपूर यांनी या पक्ष्याच्या ठिकाणाचा शोध घेतला. वन्यजीव छायाचित्रकार व पक्षी मित्र प्रवीण बाबरे यांना कल्पना दिली. मागील तीन वर्षांपासून हा पक्षी आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी उत्सुक असलेले प्रवीण यांनी त्याची सुंदर छबी कॅमेर्‍यामध्ये कैद केली आहे. अमूर फाल्कन हा समूहाने स्थलांतर करणारा पक्षी आहे.

पालघरमध्ये नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले आहे. काही दिवसांतच हा पक्षी पुढील पुढील प्रवासासाठी शारीरिकरीत्या सुद़ृढ होऊन काहीशा विश्रांतीनंतर अरबी समुद्र पार करून दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झेप घेत पुढील प्रवासाला सुरुवात करेल. विशेष म्हणजे 'अमूर फाल्कन' वर्षातून दोनदा ये-जा करतो. 2018 नंतर तब्बल 3 वर्षांनी फाल्कन स्थिरावला आहे. या पक्ष्याचा अर्धा मेंदू कायम सतर्क असतो. त्यामुळे फाल्कन सलग 48 तासांहून अधिक वेळ आकाशात उडू शकतो. भारतात अमूर, मर्लिन, शाईन आणि पेरिग्रीन असे चार प्रकारचे फाल्कन पाहायला मिळतात.

समुद्रमार्गे ओमानहून उड्डाण घेऊन थंडीच्या महिन्यात वाढवण किनारी चिंबोरी खाऊ तसेच उत्तर अमेरिकेहून रेडनेक फॅलेरोप, मंगोलियाहून उड्डाण घेऊन कलहंस हा पक्षी वाढवणमधील पाणथळ भागात दिसून आला आहे. उत्तर अमेरिकेहून रेड नेक फॅलेरोप हा पक्षी चिंचणी भागातील पाणथळ भागांत दिसून आला आहे, तर या पक्ष्यांप्रमाणे इतर 40 हून अधिक स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यात दिसून आले आहेत. अशा देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या ठिकाणांचे जतन करणे गरजेचे असल्याचे पक्षी मित्रांकडून सांगण्यात येत आहे.

पालघरमधील वसई, विरार, दातीवरे, नांदगा, दांडी, उनभात, चिंचणी, वरोर, वाढवण, बोर्डी झाई हे किनारपट्टी भाग शांत असल्यामुळे हे पक्षी येथे ऑगस्टपासून दिसायला सुरुवात होत असते. यापैकी दातीवरे आणि वाढवण किनार्‍यावर यातले पक्षी हमखास दिसत असतात. तांबड्या छातीचा हरोळी, कलहंस, नीलिमा, नवरंग, काळ्या डोक्याचा खंड्या, हळदीकुंकू बदक, नकेर, चातक, लाल कंठाची तिरचिमणी, चिंबोरी खाऊ, रेड नेक फॅलेरोप, पलास गल, उलटचोच तुतारी, सफेद मोठा कलहंस, रंगीत तुतारी, ग्रे-प्लॉवर, रिंग प्लॉवर, कॅस्पियन प्लॉवर यासारखे इतर समुद्रपक्षी किनारपट्टी पाणथळ भागांत दिसत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news