कोल्हापूर : वाघ, बिबटे, गवे उदंड जाहले; अधिवास पडतोय अपुरा अस्तित्वाच्या संघर्षामुळे वन्यप्राणी नागरी वस्तीत.

कोल्हापूर : वाघ, बिबटे, गवे उदंड जाहले; अधिवास पडतोय अपुरा अस्तित्वाच्या संघर्षामुळे वन्यप्राणी नागरी वस्तीत.

कोल्हापूर : देविदास लांजेवार

कठोर वनकायदे, वन्यप्राण्यांना लाभलेले भक्कम वनसंरक्षण, चोरट्या शिकारीवर आलेला अंकुश आदी विविध कारणांनी महाराष्ट्रातील पट्टेदार वाघ, बिबटे, काळवीट आणि गव्यांची संख्या वाढली आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाचा दर्जा वाढल्याने सर्वच प्राण्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे. मात्र जंगलक्षेत्र आहे तेवढेच असल्याने शास्त्रीयद़ृष्ट्या या प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात जागा अपुरी पडते. परिणामी अन्न आणि आश्रयासाठी ते जंगलातून बाहेर पडतात आणि नागरी वस्तीत येतात.

हा निष्कर्ष आहे महाराष्ट्रातील वन्यप्राणी तज्ज्ञ, वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य, वन्यप्राणी अभ्यासक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा. गेला आठवडाभर कोल्हापूर शहर आणि परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला होता. या आठवड्यात कोल्हापूर शहरात गव्यांचे वेगळेच 'नाईट लाईफ' अनुभवावयास मिळाले. तिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये दर आठवड्यात किमान दोन-तीन माणसे वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडत आहेत.

नाशिक, संगमनेर, जुन्नर आणि मराठवाड्यातील काही भागात बिबट्यांचा धुडगूस सुरूच आहे. आजरा, चंदगडमध्ये हत्तींच्या उच्छादामुळे शेतकरी हैराण आहेत. पिकांची नासधूस तर सुरू आहेच, आता गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तो लोकांच्या जीवनमरणाचा. कोल्हापुरात गव्याने एका युवकास ठार केल, अन्य तिघांना गंभीर जखमी केले. शुक्रवारी एक महिलाही दुसर्‍या एका गव्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. एक गवा गावातून जातो तर दुसरा शहरात घुसतो. 'गवा आला, पळा पळा' अशा आरोळ्या करवीरनगरीत ऐकायला येतात आणि एकच हलकल्लोळ माजतो. हा कल्लोळ सोशल मीडियावर आणखी वेगाने पसरतो आणि दहशत वाढते.

या पार्श्वभूमीवर दैनिक 'पुढारी'ने वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर का पडतात? ते नागरी वस्तीत का येतात? माणसांवर हल्ले का करतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. वन्यप्राण्यांच्या नागरी वस्तीतील धुडगुसावर कुणी संशोधन केले आहे का? याचीही माहिती घेतली. मात्र आजतागायत महाराष्ट्रात तरी गवे, वाघ, बिबटे मानवी वस्तीत का घुसतात, यावर कुणी संशोधन केलेले नाही. तथापि, वन्यजीव तज्ज्ञ, सरकारी वन्यजीव सल्लागार मंडळावरील सदस्य आणि वन्यजीवन अभ्यासकांनी महाराष्ट्र राज्य सरकारला अनेक शिफारशी केलेल्या आहेत. उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यांचा निष्कर्ष 'पुढारी' वाचकांसाठी देत आहे.

नैसर्गिक अधिवास प्राण्यांना अपुरा

चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक आणि राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे यांच्या मते वाघ, बिबटे यांच्या संरक्षणासाठी जागता पहारा, जंगलाशेजारच्या गाव कमिट्या वन्यप्राण्यांवर नजर ठेवत असल्याने चोरट्या शिकारीवर अंकुश आलेला आहे. वाघ, बिबटे, रानडुक्कर यांची संख्या वाढतेच आहे. पूर्वी 5-6 च्या संख्येत आढळणारे रानडुक्करांचे कळप आता 50 च्या घरात दिसत आहेत. 2018 मध्ये राज्यात एकूण 312 वाघ होते. त्यापैकी 160 वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात होते. तीच संख्या आता जवळजवळ दुप्पट झाली असून जिल्ह्यात 250-300 वाघ झाले आहेत.

चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात 40-50 वाघांचा वावर

वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवासात जागा कमी पडते. एकीकडे त्यांची संख्या वाढते आहे. जंगल क्षेत्र आहे तेवढेच आहे. जंगलात वाघ, बिबट्याला शिकार करायला कष्ट पडतात. त्या तुलनेत पाळीव जनावरांना मारणे त्यांना सोपे जाते. त्यामुळे ते गावाजवळ येतात. चंद्रपूर एमआयडीसी भागात सुमारे 40 ते 50 वाघांचा वावर आहे, असे बंडू धोत्रे यांनी सांगितले.

सरकारला सुचविले उपाय; लवकरच अ‍ॅक्शन प्लॅन

औरंगाबादचे वन्य जीव अभ्यासक दिलीप यार्दी म्हणाले, अधिवासातून बाहेर येणार्‍या प्राण्यांनी नागरी वस्तीत येऊ नये यासाठी वन्यजीव तज्ज्ञांनी राज्य सरकारला उपाययोजना सुचविल्या आहेत. प्राण्यांसाठी जंगलक्षेत्र वाढविणे, दुसर्‍या प्रदेशात प्राणी पाठविणे, तत्पूर्वी ते संबंधित वातावरणात टिकाव धरणार का, याचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे आहेत. त्यानुसार सरकार नियमावली करीत आहे. काही दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅनही तयार करणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार गवे

राधानगरी अभयारण्य आणि इतर भागात दरवर्षी गव्यांची संख्या वाढत आहे. सध्या दोन हजार गव्यांचा वावर जिल्ह्यात आहे. 2017 मध्ये 168 गवे, 2019 मध्ये 183 तर 2020 मध्ये 188 गव्यांची नोंद करण्यात आली आहे. अधिवास अपुरे पडत असल्यामुळे गवे मानवी वस्तीत शिरकाव करीत आहेत.

  • संरक्षित अधिवासामुळे मृत्यू संख्या घटली
  • चोरट्या शिकारीचे प्रमाण कमी झाले
  • संख्या वाढल्याने प्राण्यांना अधिवास अपुरा

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news