कोल्हापूर : सरकारी शाळांची पटसंख्या वाढतेय! | पुढारी

कोल्हापूर : सरकारी शाळांची पटसंख्या वाढतेय!

कोल्हापूर : प्रवीण मस्के

कोरोना संसर्गामुळे गेले दीड वर्ष शाळा ऑनलाईन सुरू होत्या. मात्र, ऑनलाईन शिक्षण समजून घेताना विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. त्यातच काही शाळांनी फी शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावला. परिणामी, बहुतांश पालकांनी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांत पाल्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील सरकारी मराठी शाळांमध्ये सात हजार विद्यार्थी वाढले आहेत. मात्र, वाढलेला पट टिकविण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे.

गेल्या काही वर्षांत मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा यासाठी पालकांचा आग्रह असे. त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिका शाळांमधील पटसंख्या कमी झाली होती. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांचे रोजगार बुडाले, अनेकजण आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे शाळांची फी भरणे पालकांना आवाक्याबाहेर गेले आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही मुलांना ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित समजत नसल्याने त्यांचे नुकसान झाले. मराठी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता वाढल्याने पालकांचा पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे ओढा वाढला आहे.

ग्रामीणसह शहरात 1 ली ते 8 वीपर्यंतच्या सुमारे 2648 शाळा आहेत. गेल्या वर्षी 1 लाख 65 हजार 914 पटसंख्या होती. यंदा ती 1 लाख 73 हजार 32 झाली आहे. यात 7 हजार 118 ने वाढ झाली आहे. करवीर (1790), शिरोळ (1175), हातकणंगले (1091) तालुक्यांतील शाळांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या 59 शाळांत 10 हजार 200 विद्यार्थी आहेत. यावर्षी महापालिका शाळांमध्ये नव्याने 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशित विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये कायम टिकविण्यासाठी मनुष्यबळ व व्यवस्थापन, प्रशासन यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. पालकांच्या विश्वासास पात्र ठरल्या तरच सरकारी शाळांचे भविष्यात चित्र नक्की बदलेल.

शिक्षकांनी कोरोना काळात रुग्णांच्या सर्व्हेबरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. समूह अध्यापन, गटा-गटाने शिक्षण सुरू ठेवल्याने पालकांचा विश्वास संपादन केला. तसेच मराठी शाळांच्या वाढलेल्या गुणवत्तेमुळे पालकांचा सरकारी शाळांकडे कल वाढला आहे. त्यामुळे यावर्षी पटसंख्या वाढली आहे.
– आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी आत्मसात केलेली अद्ययावत तंत्रस्नेही शैक्षणिक पद्धती, तिचा अध्यापनात केलेला प्रभावी वापर यामुळे मराठी शाळेत प्रवेश घेतल्याने विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे. आज सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी शाळेतून शिकलेले विद्यार्थी देदीप्यमान यश प्राप्त करत आहेत. याचा सकारात्मक परिणाम समाजमनावर होत आहे.
– लक्ष्मी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघ

Back to top button