Election Kolhapur District Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेचे इच्छुक फोडणार घाम | पुढारी

Election Kolhapur District Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेचे इच्छुक फोडणार घाम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : Election Kolhapur District Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता २० संचालकांसाठी २२४ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी गगनबावडा तालुक्यातून दोघांनी माघार घेतली. यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी एकही उमेदवार माघारीसाठी निवडणूक कार्यालयाकडे फिरकला नाही.

उमेदवारी संदर्भात आघाडीच्या नेत्यांची बैठकीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच माघारीची प्रक्रिया गती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारीवर अडून बसणारे इच्छुक माघारनाट्यात घाम फोडण्याची शक्यता आहे.

Election Kolhapur District Bank : ३६८ अर्जांपैकी १२३ दुबार अर्ज रद्द

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत एकूण प्राप्त ३६८ अर्जांपैकी १२३ दुबार अर्ज रद्द करण्यात आले, तर १९ जण अपात्र ठरले होते. मंगळवारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली.

बँकेच्या निवडणुकीत २२६ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (दि. ०७) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या दोघांनी माघार घेतली.

२२४ पैकी एकही इच्छुक माघारीसाठी फिरकला नाही

मात्र, दुसर्‍या शिल्‍लक २२४ पैकी एकही इच्छुक माघारीसाठी फिरकला नाही. २१ डिसेंबरपर्यंत माघारीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान, आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी आणि पाठिंब्याच्या निमित्ताने जोर-बैठका सुरू आहेत. तालुका स्तरावर दिग्गजांकडून आपली निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.

नेत्यांचा निरोप आल्यानंतरच माघार घ्यायची, असे अनेकांनी ठरवले आहे. उमेदवारीसाठी शेवटपर्यंत हटून बसायचे, जिल्हा बँक संचालक नसेल तर ठोस राजकीय आश्वासन घेऊनच माघार घेण्याचा इच्छुकांचा मानस आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातच माघारीसाठी गर्दी होणार्‍याची शक्यता आहे.

उद्यापासून नेत्यांच्या बैठका

येत्या शुक्रवारपासून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठका होत आहेत. यामध्ये उमेदवारी, पाठिंबा आणि माघारीबाबत चर्चेअंती निर्णय होणार आहे. तालुक्यातील माघारी आणि पाठिंब्यासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल.

एखाद्या इच्छुकाने माघार घेण्यास नकार दिल्यास डॅमेज कंट्रोलसाठी यंत्रणा उभी करण्याची रणनीती आखली जाणार आहे. आघाडी प्रमुखांची बैठक आणि निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button