Kolhapur Collector Rahul Rekhawar : RT-PCR अथवा दोन डोस घेतलेल्यांनाच कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश | पुढारी

Kolhapur Collector Rahul Rekhawar : RT-PCR अथवा दोन डोस घेतलेल्यांनाच कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Collector Rahul Rekhawar : कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांनाही तपासून सोडले जाणार आहे. याकरिता कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कर्नाटक राज्याच्या सर्व सीमेवर आजपासून तपासणी नाके सुरू केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

‘कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी आदेशाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज (दि.३०) जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माहिती दिली.

Kolhapur Collector Rahul Rekhawar : साधा मास्क रुमाल असल्यास दंडात्मक कारवाई

जिल्हाधिकारी रेखावार पुढे म्हणाले की, साधा मास्क, रुमाल असला तरी दंडात्मक कारवाई होईल. एन 95 अथवा तीन पदरी कापडी मास्क आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोगनोळी टोल नाक्यावर राज्यातून कर्नाटकात प्रवेश देताना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. ते नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राज्यात कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश काढला आहे.

या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आता कोरोना निगेटिव्ह चाचणी किंवा दोन डोस आवश्यक असणार आहेत.

संपूर्ण लसीकरण नाही …..प्रवेश नाही

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोविड प्रतिबंधासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असून ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशा 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरीत पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस विहीत कालावधीत घ्यावा. मास्क नाही प्रवेश नाही हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. आता याच पद्धतीने संपूर्ण लसीकरण नाही, प्रवेश नाही हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासगी आस्थापना, दुकानदार, घाऊक व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, एमआयडीसी, पेट्रोल पंप, रेशन दुकानदार यांनी त्यांच्या आस्थापनाच्या ठिकाणी ठळक अक्षरात संपूर्ण लसीकरण नाही प्रवेश नाही, अशा आशयाचे फलक लावावेत.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी ज्या व्यक्ती खरेदीसाठी व अन्य कारणांसाठी येतील त्यांच्याकडे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करुनच त्यांना सेवा द्यावी.

कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोरोना ओमायक्रॉन व्हेररियंटची घातकता लक्षात घेता मास्कचा वापर अनिवार्य आहे. ज्या व्यक्ती मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्याकडून शासनाने निर्धारित केलेला दंड वसूल केला जाईल. कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील.

कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५०० रुपये इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थाना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये १०,००० रुपये इतका दंड करण्यात येईल.

Back to top button